Chandrapur Meeting: लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना पूर्व विदर्भात कालपासून पावसाने हजेरी लावली. या पावसातही प्रचार सभांचा धुरळा उडत आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांत थेट सामना होत आहे. अशात काल (ता. 9) सुधीर मुनगंटीवार यांची सभा वरोरा येथे झाली. ऐन सभा सुरू होण्याच्या वेळीच पावसाला सुरूवात झाली. पण सभेसाठी आलेले लोक इंचभरही हलले नाहीत. मग मुनगंटीवार यांनीही भरपावसात माईक हाती घेतला आणि सभेला संबोधित केले.
सभेसाठी आलेल्या लोकांचा उत्साह इतका होता की बरसत्या धारांनाही ते जुमानले नाहीत. सुधीर मुनगंटीवार पावसाला थांबवू शकत नव्हते, पण पाऊसही मुनगंटीवारांना थांबवू शकला नाही. वरून जलधारा बरसत होत्या, अन् त्यात मुनगंटीवार बोलू होते. भर पावसातही लोक त्यांना ऐकायला भिजत थांबले होते. परवा (ता. 8) चंद्रपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, त्यावेळी उन्हाचा पारा चांगलाच भडकला होता, तरीही लाखोंचा समुदाय सभा ऐकायला जमला होता. त्यानंतर काल (ता. 9) वरोरा येथे मुनगंटीवारांची सभा होती. परवा तप्त उन्हाचे चटके, अन् काल चक्क जलधारा. निसर्ग हल्ली लहरी झालाय. कालच्या मुनगंटीवारांच्या सभेने २०१९मधील शरद पवारांच्या साताऱ्यातील त्या सभेची अनेकांना आठवण झाली.
मने जिंकली
सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या ३० वर्षांत राजकारणातील अनेक उन्हाळे, पावसाळे बघितले आहेत. दलित, शोषीत, पीडित, विकलांगांच्या रणरणत्या आयुष्यात जलधारा बरसवल्या आहेत. भर पावसातही मुनगंटीवारांनी आपल्या त्याच जोषात भाषण केलं. या भाषणात त्यांनी कुणाची उणीदुणी काढली नाहीत की कुणाला शिव्याशाप दिले नाहीत, तर आजवर केलेली विकास कामे त्यांनी जनतेसमोर मांडली. आजवरही त्यांचे म्हणणं हेच आहे की, तुम्ही केलेल्या विकास कामांवर मते मागा. जातीपातीचे राजकारण करू नका. कारण यामुळे समाजा-समाजांमध्ये विष कालवले जाते. कालच्या सभेतही त्यांनी केवळ विकास कामांची माहिती देऊन भविष्यातील कामांचे नियोजन सांगितले. प्रतिकुल परिस्थितीतही लढायचे कसे, हे मुनगंटीवारांना चांगले ठाऊक आहे आणि आता तर त्यांच्यासाठी अनुकुल स्थिती आहे.
काल गुढीपाडवा होता. गुढीपाडवा म्हणजे मांडवस. पूर्वीपासुन शेतकरी बांधव हा सण साजरा करतात. या उत्सवामध्ये आपल्या शेतीत जो वर्षभर प्रामाणिक, उत्तम काम करतो, त्याला आपण मांडवसला पुन्हा वर्षभर काम करण्याची संधी देतो आणि जो कामचुकारपणा करतो, त्याला कायमची सुटी देतो. आपल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा लेखाजोखा बघितला तर विकास कामे झालेली दिसत नाही. त्यामुळे आज मांडवस उत्सव आहे, याच महिन्यात लोकसभा निवडणुक आहे. तुम्ही सर्व मला लोकसभेत पाठवून मांडवसची भेट द्या. आपण माझ्यावर विश्वास ठेवून या मांडवसला लोकसभेत पाठवले तर मी जीव ओतून काम करेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला.