महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीजवळ केवळ जेलची भाषा !

Assembly Election : विकासाचा प्लान नसल्याची सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Mahavikas Aghadi : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात महाविकास आघाडीचे नेते केवळ जेलभरोची भाषा करीत आहे. महाविकास आघाडीचा एकही नेता त्यांची सत्ता आल्यावर काय करणार, हे सांगत नाही. महाराष्ट्राच्या विकासाची कोणतीही भाषा एकही नेता करत नाही. महाविकास आघाडीतील काही नेत्यांना तर आपसी दुश्मनीचा सूड उगवायचा आहे. त्यामुळे ते रोज जेलमध्ये टाकू. एक तर तू नाही तर मी अशी भाषा करीत आहेत.

महाराष्ट्रातील सद्यस्थितीत जनतेने विचार करणे गरजेचे आहे. जनतेला विकास हवा आहे की, पुढचे पाच वर्ष आपला व्यक्तीगत सूड उगविण्यासाठी केवळ जेलमध्ये टाकणारे सरकार हवे, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाविकास आघाडीला सत्ता सांभाळला आली नाही. त्यांचा त्यांचे आमदार टिकवता आले नाही. त्यांनी अफजल गुरूच्या फाशीला विरोध केला, अशांसोबत काही जण जावून बसले.

ज्यांनी अजमल कसाबला बिर्याणी खाऊ घातली, अशांसोबत खुर्ची वाटून घेतली. ज्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान केला, त्यांच्यासमोर ते वाकले. ज्यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे कधीच गेले नाही, त्यांच्या मागेपुढे हे दिल्लीत तीन तीन दिवस फिरतात. त्यामुळे केवळ पदासाठी आणि सूड घेण्यासाठी सरकार द्यायचे असते का, यावर जनतेने विचार करावा, असे मुनगंटीवार म्हणाले.

सतत जहरी शब्द

जसतशी निवडणूक जवळ येत आहे, तसतसे महाविकास आघाडीचे नेते रोज नवनवे जहरी शब्द वापरत आहेत. सत्ता आली तर महाराष्ट्राचा विकास कसा करणार हे ते बोलत नाहीत. महिलांसाठी काय करणार हे सांगत नाही. तरुणाईसाठी काय करणार हे त्यांना ठाऊक नाही. शेतकरी, शेतमजुरांसाठी कोणत्या योजना आणणार यावर त्यांना बोलायचे नाही. ते फक्त एकच एक वाक्य बोलत आहेत. जेलमध्ये टाकू. संपवून टाकू. एक तर तू राहणार किंवा मी. त्यामुळे हे नेते सुडाने पेटलेले आहेत.

कोणत्याही राज्य सरकारमध्ये लहानमोठे असे एकूण 52 खाते असतात. महाविकास आघाडीचे सरकार आले तर केवळ एकच विभाग कामाचा असेल. हा विभाग जेलविभाग असेल, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. गेल्या काही दिवसांतील या नेत्यांच्या भाषणांचे सर्व व्हिडीओ तपासावे. केवळ खालच्या पातळीवर बोलताना हे दिसतील. त्यांना विकास करण्यासाठी सत्तेवर यायचेच नाही. त्यांना केवळ महायुतीमधील नेत्यांना जेलमध्ये टाकायचे आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत दृष्टीहीन असलेल्या धृतराष्ट्रांना सत्तेवर येण्यापासून जनतेनेच रोखावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केले.

रावणाला परास्त करण्यासाठी

रामायण काळात रावणाला पराभूत करण्यासाठी श्रीरामाला विभीषणाची साथ घ्यावी लागली. अगदी त्याच पद्धतीने आधुनिक काळात परास्त करण्यासाठी महायुतीने अजित पवारांना साद घातली. कुठे बाण मारल्यावर रावण गतप्राण होईल, हे विभीषणाला ठाऊक होते. अगदी तसेच आताही आहे. औरंगजेब आणि रावणाची प्रवृत्ती असलेल्या लोकांशी हा लढा आहे. त्यामुळे महायुतीने अजितदादांची साथ घेतली.

रावण हिंदू होता. तरीही त्याचा पुतळा जाळण्यात येतो. अगदी त्याच पद्धतीने औरंगजेब आहे. त्याच्या बाबतीत धर्म आडवा आणला जाऊ नये. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना यातना दिल्या. त्यामुळे अशा वृत्तीचे केवळ धर्माच्या नावाखाली समर्थन करता येणार नाही, अशी परखड भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!