Sudhir Mungantiwar : कुणी ठरवून जातीचे राजकारण केले. आपल्या जातीतील लोकांचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढली. तर निवडून आल्यानंतर असे लोक इतर जातीच्या लोकांना काय न्याय देणार. मग इतर जातीच्या लोकांनी जायचे कुठे, असा सवाल करत जाती-पातीचे राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांचा सुधीर मुनगंटीवार यांनी खरपूस समाचार घेतला. जातीचे राजकारण करून विकास साधता येत नाही. काँग्रेस एक धोका आहे, तो ओळखा, असे आवाहन त्यांनी केले.
आज (ता. 6) चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा पार पडली. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, यापूर्वीच्या खासदारांना स्वतःच सांगितले होते की, ‘केवळ कुणबी-कुणबीचे तुणतुणे वाजवून निवडणूक जिंकता येत नाही. मी समाजाची कॅसेट वाजवत बसलो असतो, तर आज येथे नसतो. वामनराव चटप यांनी प्रयोग करून बघितला, पण त्यांनाही सव्वादोन लाखाच्या वर मते घेता आली नाहीत.’ येवढे असूनही कुणी जातीचे राजकारण करीत असेल, तर त्याला काय म्हणावे, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. जात घराच्या उंबरठ्याच्या आत असते. रोटी-बेटीच्या व्यवहारात जात बघितली जाते. सार्वजनिक जीवनात जात नसते. एखादा रुग्ण कधी म्हणत नाही की, डॉक्टर माझ्या जातीचा असेल, तरच मी जाईल, अन्यथा मरेन. जातीचे राजकारण केले आणि एका समाजाने त्याच्या समाजाच्याच उमेदवाराला मतदान केले, तर इतर समाजांनी जायचे कुठे, असाही सवाल मुनगंटीवार यांनी केला.
Lok Sabha Election : सुधीर मुनगंटीवार म्हणाले गडकरींना, ‘आपका पिछा ना छोडुंगा..!
जीव ओतून जिवतीचे पट्टे देईन..
जाती-पातीचे राजकारण करून विकास साधता येत नाही. काँग्रेसच्या विरोधात ही लढाई आहे. त्यांच्याकडे सांगण्यासाठी कामे नाहीत. त्यामुळे आपले प्रतिस्पर्धी भांबावलेले आहेत. लढाई विकासाच्या मुद्द्यावर करा. तुम्ही खासदार होते, आमदार होते, काय काम केले हे सांगितले पाहिजे. २१ कामांची यादी तुम्ही द्या. खरी असली तर मीच भर सभेत तुमचा गौरव करेन. जिवतीच्या पट्ट्यांचा प्रश्न अद्याप सुटला नाही. मी जीव ओतून जिवतीचे पट्टे देईन. गडकरींना मी सांगितले की मूर्ती विमानतळ करा. या ठिकाणी कोळसा आहे. खाणी आहे. खाणीत शेती गेल्या पण काम मिळाले नाही. त्यामुळे येथे आता आपण विकास करू, असे मुनगंटीवार म्हणाले.
तिजोरीचा कोड मला पाठ आहे..
गडकरींनी स्वतःचं कमी वजन केलं. पण राजकारणात त्यांचे वजन वाढतच आहे. १६ मार्च १९९५ ला मी विधानसभेत निवडून आलो. आता या निवडणुकीत निवडून आल्यावर केंद्राच्या योजना तर येतीलच, पण राज्याच्याही योजना आपल्या मतदारसंघात येतील. कारण मी महाराष्ट्रात पाच वर्ष अर्थमंत्री राहिलेलो आहे. तिजोरीचा कोड मला पाठ आहे. कामासाठी पैसा कसा आणायचा, हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.