महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : काँग्रेसच आरक्षणाचे खरे शत्रू

Rahul Gandhi : भाजपच्या संविधान बचाओ, काँग्रेस हटाओ आंदोलनात सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Congress On Reservation : काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. काँग्रेस सत्तेसाठी जगते. भारतीय जनता पार्टी राष्ट्रहितासाठी काम करते. त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल, तर काँग्रेसला दूर ठेवावे, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केले. त्या विरोधात चंद्रपूर येथे भाजप जिल्हा व महानगरतर्फे ‘संविधान बचाओ, काँग्रेस हटाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजप पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनात मुनगंटीवार म्हणाले, ‘काँग्रेस आणि राहुल गांधी हेच देशाचे आणि संविधानाचे खरे शत्रू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही. काँग्रेसनेच डॉ. आंबेडकर यांना (Babasaheb Ambedkar) निवडणुकीत पराभूत केले. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले आहे. त्यावरून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याचे सिद्ध होते. देशाला, संविधानाला आणि आरक्षणाला वाचवायचे असेल, तर खऱ्या अर्थाने काँग्रेसला हटविले पाहिजे.’

प्रचंड घोषणाबाजी

चंद्रपुरात झालेल्या या आंदोलनात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काँग्रेसला ओबीसी (OBC) समाजातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचे बघवत नाही. त्यांचा खरा चेहरा अमेरिकेत गेल्यानंतर समोर आला. देशाच्या विरोधात राहुल गांधी परदेशात बोलतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. काँग्रेसने फक्त त्यांच्या लोकांचा सन्मान केला. काँग्रेसला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा नव्हता. आता तर भारतरत्न बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण व्यवस्थाही त्यांना नको आहे. .

काँग्रेस लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत ते जनतेसोबत खोटं बोलली. आता तर त्यांना काय हवे आहे, हे राहुल यांनी आपल्याच तोंडून सांगितले आहे, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली. काँग्रेसचे लोक अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, बहुजनांना मानत नाही. त्यामुळे या मायावी काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे देशातील खरे रावण आहेत. याच काँग्रेसने बाबासाहेबांना ईशान्य मुंबईतून पराभूत केले. जगातील सर्वांत शिक्षित असलेल्या बाबासाहेबांना काँग्रेसने छळले. याचे कारण म्हणजे आपल्यापेक्षा दलित समाज मोठा होईल, याची भीती काँग्रेसला होती, अशी टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनात केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!