Political News : माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर हे यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्त्व. महायुतीचे उमेदवार, राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे शनिवारी (ता. 6) आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अण्णासाहेब काहीसे भावुक झालेले बघायला मिळाले.
अण्णासाहेब पारवेकरांनी नितीन गडकरी यांच्याबाबत बोलताना भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची आठवण सांगितली. ते म्हणाले, 2004 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार संदीप धुर्वे यांच्यासाठी तिकीट आणायचे होते, तेव्हा मी गडकरींना भेटायला गेलो होतो. त्यांनी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्याकडे प्रचंड गर्दी होती. म्हणून मी चिठ्ठी आतमध्ये पाठवली. त्यांनी लागलीच मला आत बोलावून घेतले आणि कडाडून मिठी मारली, हे सांगताना अण्णासाहेब भावुक झाले होते.
आज आपल्या भाषणात अण्णासाहेबांनी गडकरींवर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, नितीन गडकरी ज्या सभेला जातात, तेथील उमेदवाराचा विजय पक्का असतो. यावेळीही तेच होणार. पण नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘वरच्या’ मंडळींनी गडबड केली. उमेदवारी देण्यात गोंधळ झाला. परिणामी घाटंजी नगर परिषदेत आमचा नगराध्यक्ष आणि पांढरकवडा पंचायत समितीवर सभापती बसू शकला नाही. आता यापुढे असे होणार नाही, याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांनी घ्यावी, असे सुचवले आणि मुनगंटीवार भविष्यात अशी गडबड होऊ देणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
सभेत आमदार संदीप धुर्वे यांनीही 2004 मधील निवडणुकीची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, 2004 मध्ये अण्णासाहेबांनी माझी तिकीट आणली होती. पारव्याला पहिली सभा घेतली होती. तेव्हा बसायला खुर्च्या वगैरे नव्हत्या. मला आठवते अण्णासाहेब आम्हा सर्वांसोबत खाली बसले होते. त्या सभेत मी बोललो होतो की, नितीन गडकरी हे रोडकरी, पुलकरी आहेत आणि ते शब्द गडकरींनी तंतोतंत प्रत्यक्षात उतरवले.
काँग्रेस सरकारच्या काळात रस्ता तयार करण्याची गती १२ किलोमीटर प्रतिदिवस होती. गडकरींनी ती गती 37 किलोमीटर प्रतिदिवस इतकी वाढवली आणि देशभरात रस्त्यांचे जाळे विणले. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, असे नेते म्हणजे गडकरी आहेत. पूर्वी यवतमाळवरून नागपूरला जायला चार-साडेचार तास लागायचे आज रस्ते झाल्यामुळे दोन तासांत नागपूर गाठता येते. हे गेल्या 10 वर्षांतील कामांची एक छोटीशी पावती आहे, असेही आमदार संदीप धुर्वे म्हणाले.
सभेला व्यासपीठावर माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, आमदार संदीप धुर्वे, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वसंतराव घुईखेडकर. राजेंद्र महाडोळे, निलय नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महादेव सुपारे, गजानन बेजंकीवार, आनंद वैद्य, सुरेश डहाके, विष्णू उकंडे, अजय पालतेवार, किसन राठोड, विशाल देशमुख, रवी बेलुरकर, विनोद मोहितकर आदी होते.