विधानपरिषदेच्या सभापतिपदासाठी आज (19 डिसेंबर) महायुतीतर्फे भाजपाचे प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून सभापती प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन केले.
विधान परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, सभागृहाच्या दोन्ही बाजुंच्या सदस्यांनी आपली एकमताने निवड केली, हे आपले भाग्य आहे. यावेळी दरेकर यांनी ‘उपसभापती होत्या नीलम गोऱ्हे, त्यांच्या कारभारावर खुश आहोत आम्ही सारे… विधिमंडळाचे चांगले चालावे काम, म्हणूनच सभापती आले शिंदेचे राम!!’, अशी कविता केली.
प्रवीण दरेकर म्हणाले, राम शिंदे राजकारणातील अजात शत्रू आहेत. आमदार, पक्षाचा पदाधिकारी, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून चांगली कारकीर्द, राम शिंदे यांचा चांगला स्वभाव महाराष्ट्राने पाहिलेला आहे. चौडीच्या सरपंच पदापासून ते आज सर्वोच्च अशा सभापतीपदापर्यंत पोहोचण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. आज उच्च पदावर बसला आहात. सर्वच नेत्यांनी अभिनंदनाची भाषणे करताना चांगले संदेश दिले. राजकारणातील लोकांना एक चांगला संदेश आयुष्यात मिळतो कधी नाही मिळत. म्हणून तुम्ही लोकांसाठी चांगल्या पद्धतीचे काम करत राहा अशा पद्धतीचा संदेश दिला आहे.
ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते, राज्याच्या हितासाठी उपमुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांना कधी वाटले नव्हते की ते उपमुख्यमंत्री होतील. त्यांना सर्वतोपारी राज्याचे हित महत्वाचे आहे. कोण कुठल्या पदावर आहे, यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राचे हित जपायचे आहे, ही चांगली भावना महाराष्ट्राच्या संस्कृतीत होताना दिसतेय. श्रद्धा सबुरी हा साईबाबांचा मंत्र सर्वांनाच आचरणात आणण्याची सवय लागलीय. श्रद्धा सबुरी एवढा चांगला जीवनातील कोणता मंत्र नाही. राम शिंदे यांनाही साईबाबांचा श्रद्धा सबुरी हा मंत्रच कामी आला, असेही दरेकर म्हणाले.
आपण धनगर समाजातून येतो. जेव्हा वाटले तेव्हा समाज पाठीशी उभा राहीला. परंतु जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. या राज्यातील सर्वोच्च सन्मानाचे पद धनगर समाजाला देऊन त्या समाजाचा अभिमान, मान उंचवण्याचे काम भाजप आणि महायुतीने केले. त्याबद्दल महायुतीच्या नेत्यांनाही धन्यवाद देतो. राम शिंदे यांची कामगिरी देदिप्यमान व्हावी, अशी अपेक्षा प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.