Save Reservation Yatra : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात दोन्ही समाजातील संघर्ष उफाळलेला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका सत्ताधाऱ्यांना बसला. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासारख्या अनेक प्रस्थापितांचा आंदोलनांमुळे पराभव झाला. अश्यात राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर आमदार पंकजा मुंडे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनात सहभाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी रोखठोक भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ ‘आरक्षण बचाव’ यात्रा काढली आहे. यात्रा लातूरमध्ये पोहोचल्यावर तिच्या स्वागतासाठी चक्क पंकजा मुंडे होत्या. त्यांनी यात्रेचे स्वागत करून एकप्रकारे ओबीसी लढ्यात सहभाग नोंदविला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पंकजा मुंडे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. लातूर बीड रस्त्यावर या दोन नेत्यांची भेट झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेला शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर यात्रेचे फोटो पंकजा मुंडे यांनी शेअर केले आहेत. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याचीही माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. भाजपच्या बैठकीतील मुद्द्यांवरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय.
हा तर निव्वळ योगायोग
‘आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली. मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे निघाले होते. त्यांना पाहिल्यानंतर मी भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांची यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये आमचा सहज आणि घरगुती संवाद होता,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ज्यांचा आवाज कोणीच ऐकू शकत नाही, अश्या वंचितांना आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांना शक्ती देण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेब राजकारणात आले होते. मुंडे साहेबांनी अशा लोकांना, समाजाला संधी दिली. तेच काम आम्ही पुढे करत राहू, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मुंडेंनाही होते निमंत्रण
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैपासून सुरू झाली. आरक्षण बचाव यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. यात्रा लातूर येथे मुक्कामी होती. मंगळवारी (दि.३०) यात्रा मार्गस्थ झाली तेव्हा नवनिर्वाचित विधान परिषदेच्या सदस्य पंकजा मुंडे यांनी आंबेडकरांचे स्वागत केले. पंकजा मुंडे यांना आंबेडकर यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी पत्र लिहिले होते, हे विशेष.
अर्जासाठी विरोधकांची धडपड
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत आहेत. याला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय. लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत आहेत. मात्र तेच लोक आपल्या कुटुंबातील बहिणींचा फॉर्म भरून घेण्यासाठी धडपड करत आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत चांगली असून महाराष्ट्रातील महिलांमध्ये चांगलं वातावरण आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.