Nitin Gadkari: आपल्या बिनधास्त आणि रोखठोक बोलण्यासाठी देशभर प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज पुन्हा यंत्रणेवर तोफ डागली. ते म्हणाले, मी ५० लाख कोटी रुपयांची कामे गेल्या १० वर्षांत केली. पण एकाही ठेकेदाराला काम मागायला माझ्याकडे यावे लागले नाही. अतिशय खेदाने सांगावे वाटते की, विकास कामांतही खोडा घालणारे काही लोक आज राजकारणात आहेत. त्यासाठी आता राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे.
गडकरी आज (ता. 6) यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महायुतीचे उमेदवार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, बऱ्याच काही ठिकाणी तेथील आमदारच, पदाधिकारीच काम थांबवतात. ठेकेदाराने माल दिल्याशिवाय कामच सुरू होऊ देत नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. हे येथे बसलेल्या आमदारांबाबत बोलत नाही, असे म्हणताच हशा पिकला. गेल्या वर्षी वाशीम मतदारसंघात काही पदाधिकाऱ्यांनी पुलाचे काम थांबवले होते, त्या पदाधिकाऱ्यांना आज गडकरींनी शालजोडीतून चांगलेच फटके लगावले.
मी तोंडावर शिव्या देतो
तुम्ही नशीबवान आहात कारण तुम्हाला असा उमेदवार मिळाला की जो माझ्यापेक्षाही जास्त कल्पक आणि माझ्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवणारा आहे. पंतप्रधान मोदींनी सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने तुम्हाला सच्चा माणूस दिला आहे. एकदा निवडून द्या, मग पाहा कसा करंट सुरू होतो. कारण मुनगंटीवार यांच्यासोबत मी आहे, नरेंद्र मोदी आहेत याशिवाय महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. ते या क्षेत्राचा चेहरा बदलवून टाकतील. सर्वांना माहिती आहे की, मी तोंडावर शिव्या द्यायचे काम करतो. विनाकारण कुणाची तारीफ करत नाही. पण सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये ती क्षमता आहे, असे गडकरी म्हणाले.
मागच्या वेळी मी पांढरकवड्याला आलो होतो, तेव्हा अनेक लोकांचा अपघात झाला होता. तेव्हा अण्णासाहेब पारवेकरांनी उड्डाणपुलाची मागणी केली होती. त्याला थोडा उशीर झाला. पण आता लवकरच ते काम सुरू होणार आहे. विकास कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. आपल्याकडे कापूस स्वस्त आहे, पण कापड महाग आहे. संत्रा स्वस्त आहे, पण ज्यूस महाग आहे. सोयाबीन स्वस्त आहे पण तेल महाग आहे. याचे कारण म्हणजे आपल्या उत्पादनाचे भाव विदेशात ठरतात. ही परिस्थिती बदलवण्याची गरज आहे.
मुंबईचा समुद्र नागपूरच्या जवळ आणला
विदर्भातील कापसाच्या उत्पन्नापैकी बराचसा कापूस बांग्लादेशला जातो. सूत बांग्लादेशला जाते. ते जास्त प्रमाणात जावे म्हणूनच आपण मुंबईचा समुद्र नागपूरच्या जवळ आणला. याचा अर्थ असा की वर्धा जिल्ह्यातील सिंधी येथे सॅटेलाईट पोर्ट आणले. तेथून जगात कुठेही इंपोर्ट-एक्सपोर्ट करता येईल. वर्धा ते हल्दीया कलकत्ता रेल्वेने कंटेनर जातील. दीड लाख रुपयाचे वाहतूक भाडे ७० हजारावर येईल. जास्तीत जास्त कापूस बांग्लादेशला जाईल आणि शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल, अशी व्यवस्था आपण केली असल्याचे गडकरी म्हणाले.
अमरावती शहरानजीक नांदगावला रेमंडच्या युनिटचे उद्घाटन करायला गेलो होतो. तेथे विजेचा तुटवडा होता. मी लगेच चंद्रशेखर बावनकुळेंना फोन केला. विजेची सोय झाली. आता नांदगावला १७ टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज आहेत. लोकांना रोजगार मिळाला. कापूस उत्पादक जिल्ह्यांत टेक्सटाईल इंडस्ट्री डेव्हलप करायची गरज आहे. दीड लाख कोटी रुपयांचे तेल आपण आयात करतो. सोयाबीनची केक विदेशातील पांढऱ्या रंगाचे डुक्कर खातात. उन्हाळी भुईमुगाचे कचाट जनावरांना खाऊ घातल्यास ढोरं चांगले राहतात. हे सर्व प्रयोग शेतकऱ्यांना करण्याची गरज आहे.
Lok Sabha Election : जातीच्या नव्हे विकासाच्या आधारावर मतदान करा
विदर्भात दुधाचा महापूर झाला पाहिजे. म्हणून तेलंगखेडीला प्रकल्प सुरू केला. सांगलीमध्ये चितळे डेअरीनेही एक प्रकल्प सुरू केला आहे. शरद पवारांनी बारामतीला प्रकल्प टाकला आहे. उद्घाटन मीच केले. आता पांढरकवड्यात दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी काम करायचे आहे. महाराष्ट्र सरकारने साडेतीन हजार कोटीची योजना तयार केली आहे. शेतकऱ्यांना नवीन गायी देण्याची योजना आहे. पण शेतकऱ्यानेच २५ लीटर दूध देणाऱ्या गायी तयार केल्या पाहिजे. सुधीर मुनगंटीवारांकडे मत्स्य व्यवसाय खातेही आहे. त्यांनी पुढाकार घेतला आणि गोड्या पाण्यातले आणि खाऱ्या पाण्यातल्या झिंग्यांचे उत्पादन वाढले. आपल्याकडे ७०० ते ८०० रुपये भाव आहे. तर विदेशात ८ हजार रुपये किलो भाव आहे. हे उत्पादन आणखी वाढल्यास या क्षेत्राची भरभराट होणार आहे.
चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यात वनसंपदा भरपूर आहे. ताडोबा, टिपेश्वरसारखे अभयारण्य आहेत. मुनगंटीवार यांनी अतिशय सुंदर ताडोबा महोत्सव केला. आता यापुढे असे काम करा की, येथे जगभरातून लोक येतील, असे गडकरींनी सुधीर मुनगंटीवार यांना सुचवले. दीनदयाल उपाध्याय म्हणायचे की, ज्याला राहायला घर नाही, घालायला कपडा नाही, खायला अन्न नाही. अशा लोकांना देव मानून त्याची सेवा केली पाहिजे. त्यासाठी राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे. समाजकारण, सेवाकारण करायचे आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.