Maharashtra Politics : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. बाइक रॅली आणि धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेला उपस्थित राहण्यासाठी नागपुरातून अमरावती जिल्ह्याकडे रवाना होण्यापूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनी नागपुरात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. नितेश राणे यांनी आनंद दिघे यांच्यावरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नागपूर विमानतळावर नितेश राणे यांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यावरही राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणे म्हणाले की, आता शिवसेनेत तेवढाच जीव राहिलेला आहे. त्यांचे नारे आपल्याला ऐकू देखील आले नाहीत. कदाचित अशा चार गोष्टी करून ते खुशमस्करी करीत आहेत. नारेबाजी करून जी उरलेली शिवसेना आहे, ते येणाऱ्या बंटी-बबली यांना खुश करण्यासाठी घोषणा देत असतील. त्यामुळेच आपल्या विरोधात घोषणाबाजी केली असावी.
संविधानानुसार अधिकार
डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्याला कुठेही जाण्याचा, सभा घेण्याचा अधिकार आहे. सकल हिंदू समाजाने आपली सभा आयोजित केली आहे. ‘बाइक रॅली’ पण निघणार आहे. अचलपूरला विरोध होत आहे, हे आपण ऐकले नाही. हिंदू समाजाशी संवाद साधायला आपण जात आहोत. धर्मवीर चित्रपटावरून होत असणाऱ्या राजकारणावर नितेश राणे म्हणाले की, धर्मवीर-2 चित्रपट आला आहे. अद्यापही आपण चित्रपट पाहिलेला नाही. आपण हा चित्रपट लवकरच पाहणार आहोत. परंतु जे काही सत्य आहे, ते पुन्हा एकदा धर्मवीर चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलं आहे, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने घाणेरडे राजकारण करत होती. त्याचे कुठेतरी वस्त्रहरण धर्मवीर-2 चित्रपटात झाले आहे, असे आपण ऐकत आहे. चित्रपट बघितल्यानंतर यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देऊ, असेही त्यांनी सांगितले. आनंद दिघे यांचा खून झाल्याच्या मुद्द्यावर राणे म्हणाले, त्यांचा खून झाल्याचा संशय वर्षानुवर्षांचा आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना सोडली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनीच त्यांना मारुन टाकण्याच्या सुपाऱ्या दिल्या. राज ठाकरे यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाविकास आघाडीत मंत्री असताना मुद्दा त्यांची सुरक्षा उद्धव ठाकरे यांनी कमी केली होती.
आनंद दिघे यांचं मोठं होणं कोणाला आवडत नव्हतं? धर्मवीर-1 चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी उद्धव ठाकरे ‘क्लायमॅक्स’ला उठून निघून का गेले, हे त्यांना विचारा. नारायण राणे, राज ठाकरे (Raj Thackeray), एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवासात एकाच माणसावर संशयाची सुई का येते. राजकीय पक्षाअंतर्गत विरोधकांना मारुन टाकण्याची प्रवृत्ती एकाच व्यक्तीत आहे. आपण चार शिवसैनिकांसोबत घडलेल्या घटना सांगितल्या. राणे आणि शिंदे यांनीही सांगितलं आहे. यावरून ‘समझदार को इशारा काफी है..’ असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला.