महाराष्ट्र

Akola BJP : संतापलेल्या नेत्याचे कार्यालयाच्या खोलीला कुलूप

Internal Politics : क्षुल्लक वाद विकोपाला गेल्याने सगळ्यांना हाकलले

Groupism Reared Head : अकोल्याच्या भाजपमधील अंतर्गत वाद आता कार्यालयाला खोलीला कुलूप लावण्यापर्यंत पोहोचला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या एका नेत्यानेच हे कुलूप लावण्याचा प्रकार केला. त्यामुळे भाजपमधील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कुलूप लावताना या नेत्याने आसपास उपस्थित कार्यकर्त्यांना हाकलून लावले. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाची किनार या घटनेला आहे. घडलेला प्रकार दडपण्यासाठी भाजपने चौफेर प्रयत्न केले. प्रसारमाध्यमांपर्यंत ही बाब जाणार नाही, यासाठी घटनेच्या साक्षीदारांना सूचनाही देण्यात आली. मात्र या प्रकाराची वाच्यता आता अकोला भाजपमधील तळागाळापर्यंत सुरू झाली आहे.

भाजपच्या ज्या नेत्याने हा प्रकार केला, त्याला नागपूर जिल्ह्यातून चांगलेच ‘बॅकिंग’ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये ही खदखद सुरू होती. अखेर त्याचा उद्रेक झालाच. लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते अकोल्यात आले होते. त्यांच्यासमक्ष पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या नावाची यादी वाचण्यात आली. एका नेत्याच्या कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर काँग्रेस उमेदवारासंदर्भात केलेल्या पोस्टचा मुद्दाही चर्चेत आला. हा मुद्दा आता प्रदेश पातळीपर्यंत पोहोचला आहे. मात्र तूर्तास नागपूर जिल्ह्याने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे.

Government Scheme : ‘चकटफू’ योजना खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळावी

भरीस भर

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) भाजपचा विदर्भातून सुपडा साफ झाला. ‘होमग्राऊंड’वर काँग्रेसने (Congress) भाजपचे फूल कोमजवले आहे. नागपुरातील नितीन गडकरी यांनीच काय तो स्वबळावर विजय मिळविला. अकोल्यातील निवडणुकीत मतविभाजनामुळे भाजपला फायदा झाल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसते. त्यातही एखाद्या नेत्याचा कर्मचारी निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराला ‘विजयी भव’ अशा जाहीर शुभेच्छा देत असेल तर ‘चर्चा तो होगीही ना बॉस.’ गेल्या काही दिवसात अकोला भाजपमध्ये घडलेला घटनाक्रम पाहता कार्यकर्त्यांना येथे चाललेय काय? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. लवकरच विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) होणार आहे. त्यापूर्वी आणखी एका वादाने डोके वर काढले आहे.

आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याच्या समजुतीतून एका नेत्याचा वाद झाला. यात काही प्रमाणात तथ्यही आहे. एका आमदारानेही या नेत्याला तुम्ही लोकसभा निवडणुकीत काम केले नाही, असे म्हणत डिवचले होते. त्यानंतर सोशल मीडियाशी संबंधित एकाने या नेत्याचा बापही काढला होता. वाद वाढल्याने संबंधित नेत्याचा पारा थर्मामीटर फोडून बाहेर निघाला. त्यातूनच या नेत्याने चक्क कार्यालयातील एका खोलीला कुलूप लावून टाकले. कार्यकर्त्यांनाही बाहेर हाकलून दिले. आता या प्रकाराबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये ‘माऊथ टू माऊथ पब्लिसिटी’ सुरू झाली आहे. या प्रकारामुळे अकोला भाजप ‘पार्टी विथ डिफरन्स’चा प्रत्यय देत आहे. भाजपमध्ये सुरू झालेले वादाचे हे प्रसंग कुठपर्यंत जातात आणि किती मोठे होतात, यावर पक्षाचे अकोला जिल्ह्यातील अस्तित्व अवलंबून राहणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!