महाराष्ट्र

Maharashtra Assembly : महाराष्ट्र भक्तीधाम राजधानीत व्हावे साकार

Harish Pimple : विधानसभेत मांडला भाविकांच्या सोयीचा मुद्दा

New Delhi News : दिल्लीप्रमाणे काश्मिरात महाराष्ट्र सदन बांधण्यात येणार आहे. दिल्लीतही महाराष्ट्र सदन आहे. उत्तर भारतात अनेक भाविक प्रवास करतात. तीर्थयात्रेसाठी त्यांचा प्रवास सुरू असतो. त्यामुळे उत्तर भारतात महाराष्ट्र भक्तीधाम उभारण्यात यावे, अशी मागणी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत शनिवारी (ता. 29) लक्षवेधी मांडली. त्यावर बोलताना भाजप आमदार हरीश पिंपळे म्हणाले की, विदर्भातून मोठ्या प्रमाणावर भाविक तीर्थयात्रेसाठी उत्तर भारतात जात असतात.

दिल्लीत महाराष्ट्र सदन आहे. याठिकाणी भक्तीधामची उभारणी झाल्यास भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतात. नव्याने भक्तीधाम उभारण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. असे भक्तीधाम उभारल्या गेल्यास महाराष्ट्रातील भाविकांना येथे हक्काचा निवारा उपलब्ध होऊ शकतो.

सद्य:स्थितीत उत्तर भारतात जाणाऱ्या भाविकांना आपल्यास्तरावर निवास आणि भोजनाची व्यवस्था करावी लागते. ही व्यवस्था करताना अनेकदा भाविकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतो. बरेचदा त्यांनी लुबाडणूकही होते. त्यामुळे जसे हक्काचे महाराष्ट्र सदन उत्तर भारतात आहे, तसेच महाराष्ट्र भक्तीधाम उत्तर भारतात बांधले गेले पाहिजे, असे आमदार पिंपळे म्हणाले. निवास आणि भोजन व्यवस्था प्राप्त झाल्यास विदर्भातील विशेषत: पश्चिम विदर्भात भाविकांना मोलाची मदत होईल याकडेही आमदार पिंपळे यांनी लक्ष वेधले. भक्तीधामच्या उभारणीसाठी सरकारने भरीव निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे पिंपळे म्हणाले.

हा शिंदे कधीही खोटं बोलला नाही

वेगवेगळ्या पक्षातील आमदारांनी भावना मांडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यावर उत्तर दिले. हरीश पिंपळे यांनी मांडलेला मुद्दा चांगला असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या भूमीतून अनेक भाविक उत्तर भारतात तीर्थयात्रेसाठी जात असतात. सध्या सरकारने वारकरी वारकरी संप्रदाय महामंडळाची घोषणा केली आहे. दिल्लीत भक्तीधाम उभारण्यासंदर्भात सरकार लवकरच सकारात्मक पावले उचलेल असेही शिंदे म्हणाले. यावर सभागृहात काहींनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिंदे यांनी हा एकनाथ शिंदे आयुष्यात कधीही खोटं बोलला नाही, असे प्रत्युत्तर दिलेले. आजापर्यंत कधी शिंदे खोटं बोलला नाही. भविष्यातही बोलणार नाही, असे शिंदे म्हणाले. भक्तीधाम आणि महाराष्ट्र सदनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत असताना वारंवार व्यत्यय आल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना शांत राहण्याचे निर्देश दिले.

error: Content is protected !!