महाराष्ट्र

Gondia : माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा राजीनामा!

Gopaldas Agrawal : जिल्हा नियोजन समितीतील पद सोडले; ‘पालकमंत्री सभेत बोलू देत नाहीत’

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या आमंत्रित सदस्य पदाचा बुधवारी (दि.14 ऑगस्ट) राजीनामा दिला आहे. पालकमंत्री बैठकीत बोलू देत नसल्याचा आरोप करीत अग्रवाल यांनी जिल्हा नियोजन समितीचे पद सोडले आहे.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यलयात 14 ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेत नियोजन समितीची सभा झाली. या सभेला गोंदिया जिल्हातील खासदार, आमदार तसेच काही माजी आमदार यांना आमंत्रित सदस्य म्हणून बोलविण्यात आले. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील समस्या ठेवण्यासाठी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आवाज उठवला. पण पालकमंत्र्यांनी बोलण्यास मज्जाव केल्याने गोपालदास अग्रवाल यांनी सभात्याग केला आणि सभागृहाबाहेर पडले. पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची तानाशाही सहन करणार नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या आमंत्रित सदस्यपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुका न झाल्याने कायमस्वरूपी सदस्य नाही. त्यामुळे पालकमंत्री आत्राम तानाशाही करतात असा आरोप अग्रवाल यांनी केला आहे. असे प्रकार सतत होत असतील तर या बैठकीत उपस्थित राहून काय उपयोग, असेही अग्रवाल सभात्याग केल्यानंतर म्हणाले.

काँग्रेस प्रवेश

दरम्यान काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले गोपालदास अग्रवाल यांनी राजीनामा देऊन बरेच संकेत दिले आहेत. काही दिवसांपासून गोपालदास अग्रवाल भाजपला राम राम ठोकून पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असे बोलले जात आहे. 21 तारखेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला गोंदियात उधाण आले आहे. विशेष म्हणजे अग्रवाल यांच्या पक्षप्रवेशासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसने हाय कमांडवर चांगलाच दबाव आणल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात अग्रवाल यांनी आज दिलेला नियोजन मंडळाच्या सदस्यता राजीनामा बरेच काही स्पष्ट करतो. अशात गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला, तर नवल वाटायला नको. त्यांना एकप्रकारे मोठे कारण मिळाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!