Oath Ceremony : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शनिवारी (7 डिसेंबर) नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यांना शपथ दिली. यावेळी कोणी ईश्वर साक्ष शपथ घेतली. काही सदस्यांनी अल्लाह साक्ष शपथ घेतली. काहींनी दृढकथन केले. यावेळी भाजपचे सदस्य गिरीश महाजन यांनी घेतलेल्या शपथेमुळे अनेकांना बुचकळ्यात पडल्यासारखे झाले.
अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी महाजन पोडियम जवळ आले. ‘अहं गिरीश महाजन; ईश्वरस्य नामना..’ असे म्हणत त्यांनी शपथ घेण्यास सुरुवात केली. त्यांची भाषा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले. शपथ पूर्ण झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी मराठीतून जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हणत समारोप केला. त्यानंतर त्यांनी आपण अशी शपथ का घेतली, या संदर्भातील खुलासा केला.
सांगितले कारण
शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी विधानसभेतील काही सदस्यांकडे बघत समजले का? असा प्रश्न केला. यापूर्वीही आपण अनेकदा संस्कृत भाषेतूनच सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळे यंदाही आपण संस्कृत भाषेमधूनच विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली, असे महाजन विधानसभेतील सर्व सदस्यांना म्हणाले. त्यांची संस्कृत मधील शपथ विधिमंडळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली.
Assembly Session : चप्पल काढली, शपथ घेतली, वाकून केला नमस्कार
केंद्र सरकारने मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मराठीचा सन्मान वाढला आहे. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषा पुरातन आहेत. संस्कृत ही देवभाषा म्हणून ओळखली जाते. आजही धर्मग्रंथातील अनेक पोथ्या आणि पुराण संस्कृत मधूनच लिहिण्यात आलेले आहेत. देवांचे सर्व स्तोत्र आणि मंत्र हे देखील संस्कृत भाषेमधूनच आहेत. मराठी प्रमाणेच संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत. विधानसभेतील बहुतांश सदस्यांनी मराठीतून शपथ घेत या अभिजात भाषेचा सन्मान वाढवला. परंतु गिरीश महाजन यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेत आगळावेगळा संदेश पुन्हा एकदा सर्वांना दिला आहे.
विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सर्व 288 सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. विधानसभेचे विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार आहे. यापैकी दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या पूर्णवेळ अध्यक्षांची निवड होणार आहे. या अधिवेशनानंतर उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या अधिवेशनापूर्वी राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे. या सोहळ्याकडे अनेकांच्या नजरा सध्या लागल्या आहेत.