महाराष्ट्र

BJP Politics : जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवर

Congress : मुकुल वसनिकांच्या भेटीनंतर सर्वकाही ठरले

Change In Party : राज्यात येत्या काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ आणि ‘आउट गोइंग’ सुरू झाली आहे. विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या आणि राजकीय दृष्टी महत्वाचे असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणातही मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धृपतराव सावळे लवकरच भाजपला सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी सावळे भाजपची साथ सोडणार असल्याने पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत मागील आठवड्यात सावळेंनी मुकुल वसनिक यांची भेट घेतली. त्या बैठकीत सर्व काही ठरवल्याचे सांगण्यात येत आहे.

बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सावळे लवकरच भाजपला ‘पंजा’ दाखविणार आहेत. सरपंच ते आमदार असा प्रवास असणारे धृपतराव सावळे यांनी काँग्रेसमधून 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे यांना अनेक कार्यक्रमात डावललं जात होतं. सावळे काही वर्षांपासून नाराज होते. धृपतराव सावळे काँग्रेसमध्ये गेल्यास बुलढाणा भाजपला मोठं खिंडार पडणार आहे. त्यातच सावळे यांची घरवापसी होणार आहे.

दशकाची प्रतिक्षा

धृपतराव सावळे आणि काँग्रेस सनियंत्रण समितीचे माजी सरचिटणीस विश्‍वनाथ माळी यांनी 21 ऑगस्ट 2015 रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला होता. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईच्या प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या सोबत 11 कार्यकर्तेही भाजपवासी झाले होते. भाजपात येताना सावळे यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त अनेकदा ठरला. मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची तारीख मिळत नसल्याने पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सावळे एक मुरब्बी, जनाधार असलेला नेता म्हणून परिचित आहेत. सरपंच ते आमदार व्हाया जिल्हा परिषद अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द आहे. 2014 मध्ये धृपतराव सावळे चिखली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकीटवर निवडणूक लढले होते.

सावळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सरपंच झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. जिल्हाध्यक्षांची त्यांची कारकीर्दही महत्त्वपूर्ण ठरली होती. 2014 मध्ये विधानसभा निवडणूक सावळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस तथा बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बुलढाणा शहराबाहेरील एका फार्म हाऊसवर सावळे यांनी वासनिकांची भेट घेतली होती. बैठकीत बरीच चर्चाही झाली. याच बैठकीतच सावळे यांच्या घरवापसीबद्दल सर्व काही ठरले. लवकरच सावळे हे काँग्रेसमध्ये दिसतील असे संकेत आहेत.

error: Content is protected !!