Maharashtra CM Post : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हे आत्ता निश्चित झाले आहे. उद्या (5 डिसेंबर) सायंकाळी 5.30 वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला डझनभर नेत्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्याची घोषणा निरीक्षक आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना फडणवीस कोणता कोट घालणार, हेही ठरले आहे. त्यांचा कोट नागपुरातून मुंबईला पोहोचला आहे. भाजपसह महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अगदी चहावाल्यापासून फडणवीसांच्या हजारो चाहत्यांनी मुंबईच्या दिशेने कुच केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री होतांना सर्वांना ‘याची देही याची डोळा’ बघायचे आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या पाठोपाठ देवा भाऊंच्या लाडक्या बहीणींचीही मुंबईला जाण्याची लगबग सुरू आहे. फडणवीसांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहीणी दोन ते तीन बसेसनी आज दुपारी मुंबईकडे निघणार आहेत.
महाराष्ट्राने बघितले आहेत आश्चर्याचे धक्के..
राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे सांगता येत नाही. याचा अनुभव महाराष्ट्राने यापूर्वीही घेतलेला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना 2004 – 05 या काळात सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री बननार, हे निश्चित होते. त्यापूर्वी नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर बाहेर येत स्वतः सुशील कुमार शिंदे यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनतील, अशी घोषणा केली. महाराष्ट्रासाठी धक्कादायक असा हा निर्णय होता.
2019मध्ये अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग अस्तित्वात आणला. मविआचे सरकार 2 वर्ष 8 महिने चालले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘न भूतो’ अशा घडामोडी घडल्या. कट्टर शिवसैनिक तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतरही कित्येक घडामोडी (सुरत, गुवाहाटी) महाराष्ट्राने पाहिल्या. या सर्व उलथापालथीचे जनक देवेंद्र फडणवीस होते. (नंतर सभागृहात एकनाथ शिंदे यांनी तशी कबुलीही दिली होती) आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे चित्र सर्वत्र होते. पण फडणवीसांनीच एकनाथ शिदे मुख्यमंत्री बनतील, अशी घोषणा केली. यावेळीही महाराष्ट्राला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला होता.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सरप्राईज, हे आता समीकरणच होत चालले आहे. यापूर्वी काही राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या जोडगोळीने असे सरप्राईज दिलेले आहेत. महाराष्ट्रात महायुतीने आजवर कधीही कुणीही नव्हे असे घवघवीत यश मिळवले आहे. त्यानंतर लवकर सत्ता स्थापन होईल, असे सर्वांनाच वाटले होते. पण आज 10 -12 दिवस लोटूनही नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. शपथविधीची तारीख 5 डिसेंबर ठरली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झाले. यावेळीही सस्पेंस ताणून अखेरीस फडणवीसांच्याच नावाची घोषणा करणे, हेसुद्धा भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांचे सरप्राईजच आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही