महाराष्ट्र

Oath Ceremony : भाऊ, दादा दोघेही गुलाबी गुलाबी 

Mahayuti 2.0 : दोघांच्या केमिस्ट्रीने मिळवली चर्चा 

Azad Maidan Mumbai : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यासपीठावर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आले. व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही आजूबाजूला बसले होते. त्याच्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डाव्या हाताला बसून होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यानंतर डाव्या बाजूला एकनाथ शिंदे हे बसले होते. 

शपथविधी सोहळ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केमिस्ट्री चांगलीच दिसून आली. व्यासपीठावर आल्यापासून फडणवीस यांच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी हास्य फुललेले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हास्य विनोद सुरू होता. दोघांनीही एकमेकांशी चर्चा केल्यानंतर हस्तांदोलन केले. राष्ट्रगीत आणि राज्यगीत नंतर शपथविधी सोहळ्याला रीतसर सुरुवात झाली. 05 वाजून 36 मिनिटांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे उपमुख्यमंत्री

शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर शपथ घेतली. यावेळी शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात आधी उल्लेख केला. त्यानंतर गुरुस्थानी असलेल्या आनंद दिघे यांचेही नाव त्यांनी घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नावही त्यांनी शपथ घेण्यापूर्वी घेतले. त्यानंतर राज्यातील कोट्यवधी मतदारांचे आभार मानत त्यांनी ‘मी एकनाथ शिंदे..’ असे म्हणत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Devendra Fadnavis 3.0 : देशभरातील मान्यवरांची शपथविधीला हजेरी 

राज्यपालांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या. त्यावेळी मोदी आणि शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. सायंकाळी 05 वाजून 43 मिनिटांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ घालवला आहे. महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनीच लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानंतर राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या सल्ल्याने अजित पवार यांनी पक्षाला आणि स्वतःला गुलाबी रंगांमध्ये मिसळले होते. त्यांचा हा गुलाबी रंग शपथविधी सोहळ्यामध्ये देखील कायम होता.

मोदींकडून तीनदा नमस्कार 

महायुती सरकारला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावरून जनसमुदायाला तीन वेळा वाकून नमस्कार केला. त्यानंतर मोदी यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खासदार प्रफुल पटेल यांच्याजवळ मोदी काही वेळ थांबले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!