Pune Meeting : विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिले होते. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला. आजही देशात जे आरक्षण आहे, ते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा वाढवल्याने त्यांची मर्यादा वाढविल्याने आहे. लोकांना संविधात रद्द होईल अशी भीती दाखविली जात आहे. आरक्षण रद्द होईल, असे खोटे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला जोरदार प्रत्युत्तर द्या, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
पुणे येथे भाजपच्या कार्यकारिणी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काही जण महायुती निवडून आली तर आरक्षण संपेल असा अपप्रचार करीत आहेत. अपप्रचाराला जास्त दिवस आयुष्य राहात नाही. खोटे जास्त दिवस टिकत नाही. विरोधकांच्या खोट्या विजयाचा फुगा विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) फुटला आहे. राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दुफळी निर्माण केली जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
आरक्षणावरून खेळ
राज्यात सध्या अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत. काही नेत्यांना वाटते हे समाज जर एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ. यातून केवळ राजकारण करण्यात येत आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भूमिका आहे. आतापर्यंत शरद पवार यांनी का आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे कोण म्हटले हे सर्व समाजाला माहिती आहे. आम्ही आरक्षण दिले आणि ते टिकवले सुद्धा. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारला आरक्षण टिकविता आले नाही. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर नव्याने आरक्षण देण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत भूमिका काय आहे, हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना विचारायला हवे. समाजाला न्याय मिळवून देण्सासाठी आमची शिव्या खाण्याची तयारी आहे. परंतु तुमची दुटप्पी भूमिका सुरू आहे. त्याचे काय? महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यातील अनेक योजना बंद झाल्या. योजना बंद करणारे हे सरकार होते. लाडकी बहीण योजनेचे अर्ज महाविकास आघाडी भरून घेईल, पण ही योजना महिलांपर्यंत पोहचू देणार नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उत्तर देता येते. कार्यकर्ता विचार करतो की, आदेश आला तर उत्तर देईल. पण आता कोणीही आदेशांची प्रतीक्षा करू नका. खोट्याला खऱ्याने उत्तर द्या, असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले..