BJP Vs NCP : देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा अनिल देशमुख यांनी पुरावे सादर करावे असे ओपन चॅलेंज पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे. यासंदर्भात वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटाला फाटोने उत्तर आम्हालाही देता येते. यात कसला पराक्रम. अनिल देशमुख जनतेला पुरावे का देत नाहीत. तुम्ही पुरावे सादर करा. पुढच्या तीन तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत, अशा इशाराही वाघ यांनी दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. भाजपकडून देशमुख यांना जोरदार प्रतिआव्हान देण्यात आलेले आहे.
चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांना टॅग करीत चित्रा वाघा यांनी ही पोस्ट केली आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. चित्रा वाघ यांनी समित कदम यांचा शदर पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनीही काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपने दबाव आणल्याचे त्यांनी म्हटले होते. अनिल देशमुख यांनी फडणवीसांनी पाठवलेल्या व्यक्तीचे नाव समित कदम असल्याचे सांगितले होते.
कदम यांचा खुलासा
समित कदम यांनी पुढे येत त्यावेळी का घडले होते, याबाबत खुलासा केला. त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप नाट्य रंगले आहे. फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम यांना पाच-सहा वेळा पाठवले, असे देशमुख म्हणाले होते. देशमुख यांच्या या आरोपांनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांच्या या आरोपांना दुजोरा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. आपल्याकडेही पेनड्राइव्ह तयार आहेत. आपण कोणाच्या वाट्याला जात नाही. आपल्या वाट्याला येणाऱ्याला सोडत नाही, असा सावध इशाराही त्यांनी आरोप करणाऱ्यांना दिला.
आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरींमध्ये विदर्भातील भाजपचे आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनीही उडी घेतली होती. डॉ. फुके यांनी देशमुखांचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. देशमुख हे प्रकृती खराब असल्याने जामिनावर सुटले आहेत. मात्र ते प्रचारात व्यस्त आहेत. त्यांची प्रकृती आता ठिक दिसत आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामिन रद्द करावा, असे डॉ. फुके म्हणाले. त्यांच्या या आरोपांना अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी सोमवारी (ता. 29) नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.