Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीकडून संविधान बदलविणार असा खोटा प्रचार करण्यात आला. लोक या प्रचाराला बळी पडले. विरोधकांनी जातीवादाचे राजकारण केले. त्यांचा हा जातीवाद जिंकला आहे. विकासाचे राजकारण यात मागे पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतसाठी मतं मागितली होती, असे ते म्हणाले.
विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला मतदार बळी पडले. ही धोक्याची घंटा आहे. ही परिस्थिती समाजासाठी ठिक नाही. लवकरच विरोधकांचे खोटे उघड होईल. जातीयवादाच्या आधारावर विरोधकांनी सर्वत्र मतं मागितली. जेव्हा भाजपला विजय मिळायचा तेव्हा ईव्हीएमवर खापर फोडले जायचे. आता महाविकास आघाडी का म्हणत नाही की ईव्हीएम बरोबर आहे. विरोधक खोटे बोलून मतं घेतात. एकदा यासंदर्भात जनता भ्रमित झाली. असे वारंवार होणार नाही, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
फडणवीसांचे काम योग्य
देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम केले. त्यांनी कामात कोणताही कसूर केला नाही. सरकारने घरकूल दिले. शेतकऱ्यांना सन्मान दिला, तरीही जनतेने काही क्षणासाठी अशांना दूर केले. जातीच्या राजकारणात जनतेने मतदान केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखवल्या. त्यामुळे त्यांनी जवाबदारी स्वीकारली. आम्ही केंद्राला विनंती करतो की देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये ठेवावे. फडणवीस सरकारमधून गेल्यास मोठा परिणाम होण्याची शक्यता बावनकुळे यांनी व्यक्त केली.
भ्रम दूर करणार
यंदाच्या निवडणुकीत विरोधकांची अपप्रचारावर भर दिला. विरोधकांनी भ्रम तयार केला. भ्रम दूर करण्याचे काम करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी मोलाचे काम केले. परंतु काँग्रेसने लोकांची दिशाभूल केली. लोकांमध्ये त्यामुळे संभ्रम तयार झाला. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम झाला. मतदान कमजोर झाले. कोणतीही एक निवडणूक हरल्याने प्रचंड मोठा फरक पडत नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते जातपात सोडतील. मुस्लिम, बौद्ध, आदिवासी, समजाला विरोधकांनी केवळ भीती दाखविली. भाजप ही भीती दूर करेल, असे वावनकुळे यांनी सांगितले.
MLA Sanjay Gaikwad : ..शिंदे गटाच्या आमदाराने वाचला महायुतीच्या चुकांचा पाढा
एनडीएचा विजय
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए जिंकली आहे. विकसित भारतसाठी काम होणारच आहे. त्यामुळे देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ठाकरेंचे खासदार संजय राऊत केवळ संभ्रम पसरवित आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे नेते आहेत. तेच पंतप्रधान होतील. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजप पुढे आहे. काही जागांवर भाजप अत्यत कमी मतांनी पराभूत झाली आहे. सर्वंकष विचार केल्यास गेल्या वेळीच्या तुलनेत मतं वाढली आहेत. बावनकुळे यांनी हे सांगितले. महाविकास आघाडीचा विजय कपट कारस्थानाने झाला आहे. ही शकुनी नीती आहे अशी टीका त्यांनी केली.