महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी मोदींच्या 15 योजना थांबविल्या

BJP Stand : पुन्हा महाविकास आघाडी आल्यास काहीच मिळणार नाही

Criticized Congress : महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या 15 योजना थांबविल्या होत्या. जलशिवारसह अनेक योजना रद्द केल्या. पुन्हा एकदा राज्यात हे सरकार आले तर केंद्र आणि महायुती सरकारच्या सर्व योजना रद्द होतील. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते नागपुरात बोलत होते. महाविकास आघाडी आणि काँग्रेस योजना बंद करणारे आहेत. त्यामुळे जनतेने सावध व्हावे असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी ही भंगार आहे. आघाडीतील खासदार संजय राऊत यांच्यावर बोलण्यासाठी नीतेश राणेच काफी आहेत. उद्धव ठाकरे कोणत्या अवस्थेत बोलत आहेत, हे त्यांनी पाहावे. अमित शाह यांनी कलम 370 हटवून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. बाळासाहेबांचे स्वप्न साकार केल्याने खरे तर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचे कौतुक करायला हवे. परंतु ठाकरे आता केवळ मुस्लिम मतांवर डोळा ठेवून आहेत. उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. त्यामुळे नागपुरातील पागलखाना चौकात असलेल्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

वाझे यांची चाचणी व्हावी

सचिन वाझे हे नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहेत. अशात अनिल देशमुख यांनीही टेस्टला टेस्टच्या माध्यमातून आव्हान देणे गरजेचे होते. वाझे टेस्ट करून घ्यायला तयार आहे तर आपण देखील अशी टेस्ट करून घेऊ. सत्य काय आहे, ते जनतेसमोर येईल असे देशमुख यांनी म्हणायला हवे होते. मात्र देशमुख केवळ हवेत गोळीबार करीत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही. पुरावे असते तर त्यांनी ते केव्हाच दाखविले असते. परंतु उगाच तोंडाची वाफ गमवायची आणि खळबळ उडवून द्यायची असा प्रकार देशमुख करीत आहे. तीन वर्षांनंतर ऐन निवडणुकीपूर्वीच देशमुख यांना पेनड्राइव्ह कसा सापडला याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही देशमुख म्हणाले.

मराठा समाजाला न्याय देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाविकास आघाडीने हे आरक्षण गमावले. पुन्हा हा मुद्दा एकनाथ शिंदे सोडवतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेतून होणारा खर्च सरकारी तिजोरीतून जाणार आहे. जनतेचा पैसा जनतेलाच जात आहे. अशात संजय राऊत यांना काय त्रास आहे. लाडकी बहीण योजनेसाठी भाजप, शिवसेना, संजय राऊत, उद्धव ठाकरे, काँग्रेस यापैकी कोणाच्याही खिशातून रक्कम चाललेली नाही. त्यामुळे महिलांना रक्कम मिळाली तर बिघडले कुठे, असा सवालही बावनकुळे यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!