Assembly Election : काँग्रेसचे रक्त हे विकास करण्याचे नाही. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पोकळ घोषणा आहेत. महाविकास आघाडीचा जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणा आहेत. महायुतीनं जे करून दाखवलं तेच काँग्रसे आपल्या जाहीरनाम्यात सांगत आहे. त्यामुळं त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसने आजपर्यंत निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. त्यामुळं काँग्रेस केवळ फसवणूकच करते अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपुरात रविवारी (10 नोव्हेंबर) त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे मतांसाठी काहीही बोलतात. त्यांच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही असं खरगे म्हणाले. खरगे कधी संघ मुख्यालयात आले होते, असा प्रश्न त्यांनी केला. कधी संघ मुख्यालयात जाऊन आले का? खरगे यांच्याकडे खास दुर्बिण आहे का? असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
संघ मुख्यालयात यावे
मल्लिकार्जुन खरगे यांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात यावं. संघ मुख्यालयात काय काय आहे, हे त्यांना कळेल. संघाचे काम कसं चालतं हे त्यांना दिसेल. संघावर टीका करण्यापेक्षा खरगे यांनी संघाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संघ काय जाणून घेतले तर त्यांना संघ कळेल, असेही बावनकुळे म्हणाले. हरियाणातील विधानसभा निवडणुकीबाबत बावनकुळे यांनी भाष्य केलं. हरियाणामध्ये काय झाले हे देशाने बघितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जाते. मात्र मोदी हे योग्य व्यक्ती असल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
महायुतीकडून ज्या योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत, त्याच योजनांची कॉपी आता महाविकास आघाडी करीत आहे. राज्य सरकारने महिलासह युवक व शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्यानंतर त्याचा लाभ मिळत आहे. आता केवळ मताच्या भीतीपोटी काँग्रेसने पुन्हा खोटेपणा सुरू केल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली. भाजपचे खासदार महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले.
का केले असे वक्तव्य..
लाडकी बहीण योजने बाबत भाजपचे खासदार महाडिक यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्याबद्दल महाडिक यांनी माफी मागितली आहे. भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी भावनेच्या भरात किंवा उत्साहात असे वक्तव्य करू नये, अशी सूचना देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेत तीन हजार रुपये देणार असं आघाडी म्हणत आहे. हा खोटारडेपणा असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.