‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे’ असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. शिक्षणाचा जेवढा जास्त प्रसार, तेवढा विकासाचा मार्ग सोपा, असं सरळ गणीत आहे. या देशातील जो वर्ग जंगलांच्या सान्निध्यात राहतो, विकास पोहोचूनही शिक्षणाच्या अभावामुळे तो मागास आहे, आर्थिक आणि सामाजिकस्तरावरील मुख्य प्रवाहात जो वर्ग सामील नाही, अशांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याची गरज कालही होती आणि आजही आहे.
लक्ष्मणराव मानकर गुरुजींनी हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवला आणि दलित, आदिवासी, गरीब समाजातील लहान मुलांकरिता शिक्षणाची सोय उभी केली. त्यासाठी त्यांनी अख्खे आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निधनानंतर समविचारी लोकांनी एकत्र येऊन कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था स्थापन केली. आदिवासी भागांमधील एकलव्य एकल विद्यालयांच्या माध्यमातून संस्थेचा शिक्षण क्षेत्रातील सेवायज्ञ गेली 26 वर्षे निरंतर सुरू आहे, याचे मनस्वी समाधान आहे.
निसर्गाशी आपली नाळ घट्ट बांधून ठेवणारा आदिवासी वर्ग आता हळूहळू प्रगत होत आहे. सर्वांत मोठे उदाहरण द्यायचे झाले तर महामहीम राष्ट्रपती (President Of India) द्रौपदी मुर्मू या देखील आदिवासी समाजाचेच प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक क्षेत्रात आदिवासी समाजातील प्रतिनिधित्व आपल्याला बघायला मिळते. तरीही शिक्षणाचा (Education) प्रसार हे कधीही न थांबणारे कार्य आहे.
शहरी जीवनापासून, भौतिक सोयीसुविधांपासून आणि माहितीच्या प्रचंड अशा प्रवाहापासून अनेक योजने दूर असलेल्या या वर्गातील नवीन पिढीमध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भातील अतिदुर्गम भागांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्याचे चांगले परिणाम आज बघायला मिळत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ अशा आठ जिल्ह्यांमधील आदिवासी भागांमध्ये एकूण 1 हजार 35 एकल विद्यालये संस्थेच्या माध्यमातून चालविली जातात.
मोठा लाभ
आज या एकलव्य एकल विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 हजार 382 एवढी आहे. यातून कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या कार्याचे यश दिसून येते. एकल विद्यालये सुरू करणे जेवढे आव्हानात्मक नव्हते, त्याहीपेक्षा जास्त आव्हानात्मक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणणे होते. नक्षलग्रस्त (Naxal) भागांमध्ये तर शिक्षकांना वेगळ्याच आव्हानांचा सामना सुरुवातीच्या काळात करावा लागला. आज त्याच आदिवासी जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांमध्ये सर्वाधिक 340 एकल विद्यालये आहेत आणि सर्वाधिक 10 हजार 120 विद्यार्थी देखील याच भागात आहेत.
आदिवासी भागांमधील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, अतिदुर्गम भागांमध्ये शिक्षणाचे वातावरण निर्माण करणे या उद्देशाने हे कार्य सुरू झाले आणि त्याची खऱ्या अर्थाने प्रचिती आज येत आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था एक व्रत म्हणून हे कार्य करीत आहे. कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय केवळ दानकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्यावर हे कार्य सुरू आहे.
एखादे व्रत हाती घेतल्याप्रमाणे शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग काम करतोय, ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. शिक्षणाच्या सेवायज्ञातील त्यांचे योगदान तेवढेच दखलपात्र ठरते. 200 ते 1 हजार 500 लोकसंख्या असलेल्या गावाची शाळेसाठी निवड करण्यात येते. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेची (Zilla Parishad School) वेळ सोडून इतर वेळी समाजभवनसारख्या सार्वजनिक ठिकाणावर शाळा भरविण्यात येते.
Lok Sabha Election : संविधानाचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसचेच!
ग्रामस्थांना सुविधा
विशेष म्हणजे गावकऱ्यांची सोय बघून सकाळी किंवा संध्याकाळी शाळेची वेळ ठरविण्यात आली आहे. शाळेसाठी शिक्षक नेमताना गावातीलच सुशिक्षित तरुणाची निवड करण्यात येते. बारावी किंवा पदवीचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला ही जबाबदारी सोपविण्यात येते. यामागे गावकरी आणि विशेषतः मुलांमध्ये अनोळखी व्यक्ती शाळेत शिकवायला येते, अशी भावना निर्माण होऊ नये असा प्रयत्न असतो. अर्थात यातून स्थानिकांसाठी रोजगाराचेही दालन खुले होत असते. संस्थेच्या या प्रयत्नांना शंभर टक्के यश आलं आहे, हे मी आनंदाने नमूद करतो.
📍नागपुर
नंदिनी, सानवी और कावेरी का सुरक्षा जवानों के साथ रक्षाबंधन।#RakshaBandhan2024#रक्षाबंधन#HappyRakshaBandhan2024 pic.twitter.com/GH6xuniA50
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 19, 2024
एकल विद्यालयात सेवा देणाऱ्या शिक्षक-पर्यवेक्षकांचा पाच दिवसांचा प्रशिक्षण वर्ग दरवर्षी नागपुरात आयोजित करण्यात येतो. त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च संस्था स्वतः करते. या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रांमधील नामांकित व्यक्तिंना आमंत्रित करण्यात येते. उद्याचा उत्तम नागरिक घडविण्याची मोठी जबाबदारी ज्या शिक्षकांवर आहे, ते या प्रशिक्षण सत्रात अतिशय आनंदाने सहभागी होतात. यंदाही 1 हजार 35 शिक्षक आणि 134 पर्यवेक्षक नागपुरातील प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले आहेत. अतिदुर्गम भागातील नवीन पिढीला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याच्या या कार्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यांच्या समर्पणाला अधिक प्रोत्साहन मिळावे, हाच या शिबिराचा उद्देश असतो. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे हे कार्य जितके व्यापक होईल, तेवढा आपल्या देशाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या कार्याच्या मागे समाजाने सर्व सामर्थ्यानिशी उभे राहावे आणि त्यात योगदान द्यावे, असे माझे विनम्र आवाहन आहे.