Recovery From Sunil Kedar : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात सुनिल केदार यांना शिक्षा झाली आहे. कायद्यानुसार त्यांच्याकडून घोटाळ्यातील 1 हजार 444 कोटींची रक्कम वसूल व्हायला पाहिजे. सध्या वसुलीचा मुद्दा राज्य सरकारच्या सहकार विभागाकडे प्रलंबित आहे. सहकार मंत्र्यांनी वसुलीची प्रक्रिया सुरू करायला हवी. केदार यांच्यासाठी सहकार विभागाची वेगळी असू नये अशी अपेक्षा भाजपचे नेते तथा माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केली. देशमुख यांनी शुक्रवारी (ता. 13) नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
केदार यांची आमदारकी रद्द
सुनिल केदार यांना कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे. उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनीच ही शिक्षा कायम ठेवली आहे. केदार यांची आमदारकीही रद्द झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नियमाप्रमाणे रकमेची वसुली होणे अभिप्रेत आहे. सहकार मंत्र्यांनी यासाठी तातडीने आदेश देणे गरजेचे आहे. वसूल केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला हवी. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे सहकारी विभागाने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
आंदोलनाची सुरुवात
सुनिल केदार यांच्याकडून वसुली न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आशिष देशमुख यांनी दिला होता. त्यानुसार आता नागपूर जिल्ह्यात भाजपने आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी (ता. 13) रामटेक, पारशिवनी भागातील शेतकऱ्यांना सोबत घेत भाजपने आंदोलन सुरू केले. रामटेकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत (SDO) बेधडक मोर्चा काढण्यात आला. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही 1 हजार 444 कोटी रुपयांची वसुली का करण्यात येत नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला. तत्पूर्वी माजी आमदार देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
घोटाळ्याच्या 22 वर्षांनंतर केदार यांना शिक्षा झाली आहे. दोषसिद्धी झाल्यानंतर आता केवळ रकमेच्या वसुलीचा प्रश्न आहे. परंतु सहकार विभाग यात दिरंगाई करीत आहे. या दिरंगाईच्या विरोधात आता शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा विनंती आहे की, त्यांनी वसुली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी. तांत्रिक व न्यायालयीन अडचण दाखवित सुनिल केदार वेळकाढूपणा करीत आहेत. त्यामुळे वळसे पाटील यांनी तत्काळ वसुली आदेश काढावे, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी केली.
कृषिमंत्र्यांवर दबाव
विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी मुंडे यांच्यावर दबाव टाकला. असाच दाबाव केदार वळसे पाटलांवर टाकत आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, असेही आशिष देशमुख म्हणाले. दिलीप वळसे पाटील, सुनिल केदार, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांचे जुने संबंध आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्ना पुढे वळसे पाटील आणि मुंडे यांनी हे संबंध बाजूला ठेवावे, अशी मागणी ही देशमुख यांनी केली.