Anil Bonde Vs Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आंदोलन सुरू आहे. त्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण बरेचदा आरोपांची पातळी घसरल्याचेही दिसून येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यात आघाडीवर आहेत. मगत त्यांना प्रत्युत्तर देताना इतर नेत्यांची भाषाही खालच्या पातळीवर जाताना दिसते. पण आता यात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी जरांगे आणि श्याम मानव यांच्यावर केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
रविवारी (दि.४) यवतमाळमध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते सामील झाले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी शाम मानव आणि मनोज जरांगे यांच्याबाबत केलेली टीका नवा वाद पेटविण्यास पुरेशी ठरू शकते.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. आता, विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राज्यात किती जागा लढवायच्या हे 13 ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार युद्ध सुरू झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा संदर्भ देत मानव यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं. त्यावरुन, आता भाजप नेतेही आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत.
यवतमाळ येथे पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनात खासदार अनिल बोंडे यांनी मार्गदर्शनपर भाषण दिले. ‘विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवत आहेत. सरकारवर भुंकण्यासाठी विरोधकांनी श्याम मानव आणि मनोज जरांगे यांना सोडलं आहे,’ अशी टीका डॉ. अनिल बोंडे यांनी केली. तर ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो 83 वर्षांचा म्हातारा हा मराठा समाजाचाच मुख्यमंत्री होता असेही बोंडे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता म्हटले. फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देखील लावला नाही, याचाही त्यांनी उल्लेख केला.
शरद पवारांवर टीका
अनिल बोंडे पुढे म्हणाले, ‘मनोज जरांगेला मी विचारतो अरे बाबा मराठ्यांच्या आरक्षणाविषयी तू बोलतो. पण आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते हे माहिती आहे का? यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण होते. ज्याच्या सांगण्यावर तू बोलतोय. तो 83 वर्षांचा म्हातारा सुद्धा मुख्यमंत्री होता. तेव्हा शालिनीताई मराठ्यांसाठी आरक्षण मागत होत्या. तेव्हा सुद्धा आरक्षण भेटलं नाही.’