National Pride : सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात वक्तव्य केले आहे. परदेशात जाऊन त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले. परदेशातील काही नेत्यांशी भेट घेतली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर चौफेर टीकेचा भडीमार होत आहे. देशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यामुळे वातावरण पेटणार आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर टीकेचे क्षेपणास्त्र डागले आहे.
देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहण्याची काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची जुनी सवय आहे. आरक्षण संपविण्याच्या त्यांच्या अमेरिकेतील वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा देशासमोर आला आहे, असा घाणाघात अमित शाह यांनी केला. अमेरिकेतील भेटीमध्ये जॉर्ज टाऊन विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपविण्याबद्दल विचार करेल, असे वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. यावरून संपूर्ण देशभरात तीव्र प्रसाद उमटले आहेत. नेमका याच मुद्द्याला हात घालत अमित शाह यांनी राहुल गांधींना आडव्या हाताने घेतले आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी टीका केली. जोपर्यंत भाजपचे सरकार देशात आहे, तोपर्यंत कोणीही आरक्षण संपवू शकत नाही. देशाच्या सुरक्षेची खेळी करू शकत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राष्ट्रविरोधी शक्तींसोबत
जम्मू-काश्मीर येथील नॅशनल कॉन्फरन्सचा अजेंडा राष्ट्रविरोधी आहे. कलम 370 बाबातही वाद होता. यात काँग्रेसची भूमिका राष्ट्रविरोधी होती. भारत विरोधी असा लौकिक असलेल्या लोकप्रतिनिधींना राहुल भेटले आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी हे नेहमीच राष्ट्रविरोधी शक्तींच्या सोबत उभे राहिले आहेत. त्यातून त्यांचा खरा अजेंडा समोर येतो, असेही अमित शहा यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चीनबाबत (China) वक्तव्य केले. या वक्तव्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही टीका केली आहे. राहुल गांधी यांनी चुकीचे वक्तव्य करून देशवासीयांची दिशाभूल करू नये, असा सल्ला राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
अमेरिकेतील लोकप्रतिनिधी ईहान ओमर आणि राहुल गांधी यांच्या भेटीवरून वाद सुरू झाला आहे. भारत विरोधी असे लौकिक ईहान ओमर यांना ओळखले जाते. त्यांना राहुल गांधी यांनी भेटणे चुकीचे आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे योग्य नाही, असे म्हणत सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर तोफ डागली. ईहान ओमर यांना पाकव्याप्त काश्मीरच्या दौऱ्यावर नेले होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयला (ISI) सहानुभूती दर्शविणारे वक्तव्य केले होते. याचा दाखलाही सुधांशू त्रिवेदी यांनी दिला. राहुल गांधी यांचे कृत्य व परदेशातील वक्तव्य राष्ट्रहिताच्या दृष्टीने धोकादायक असल्याचेही त्रिवेदी यांनी नमूद केले.