Mahayuti : राज्यात महायुतीला संपूर्ण बहूमत मिळाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचाही निकाल लवकरच लागेल. पण त्याहीपूर्वी मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार, याची जोरदार चर्चा होत आहे. नागपुरातून कोणत्या आमदाराला मंत्रीमंडळात स्थान मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. तुर्तास अनुभवाच्या जोरावर एका आमदाराला संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे ही दोन नावे मंत्रीमंडळात निश्चित आहेत. पण यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाला संधी मिळू शकते, याबाबत उत्सुकता लागलेली आहे. नागपुरात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले कृष्णा खोपडे यांच्या वाट्याला मंत्रीपद येईल, असे सर्वांना वाटत आहे. कृष्णा खोपडे यांचा पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथा विजय आहे. काँग्रेसचे सतिश चतुर्वेदी यांचे पूर्व नागपुरातील वर्चस्व संपविण्याचे काम खोपडे यांनी केले.
विधानसभा निवडणूक असो वा लोकसभा असो, कृष्णा खोपडे यांची कामगिरी कायम अव्वल राहिली आहे. यंदा त्यांनी 1 लाख 15 हजार 288 मतांनी विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेसचे बंडखोर, अजित पवार गटाच्या बंडखोर मैदानात होते, पण खोपडेंना काहीही फरक पडला नाही. त्यांनी लाखाच्यावर मताधिक्य घेऊन बाजी मारली. विदर्भात सर्वाधिक आघाडी घेऊन विजयी झालेले ते एकमेव उमेदवार आहेत. तर ही कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या आमदारांमध्येही त्यांचा समावेश होतो.
याशिवाय लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पूर्व नागपुरातून 73 हजार मतांची आघाडी होती. गडकरी यांच्या एकूण मताधिक्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक वाटा पूर्व नागपूरने उचलला होता. त्याचे श्रेय अर्थाच आमदार कृष्णा खोपडे यांना जाते. त्यामुळे गडकरी कायम त्यांचे कौतुक करीत असतात. शिवाय त्यांनी पूर्व नागपूरसाठी मागितलेला प्रत्येक प्रकल्प मंजूर करण्याकडेही गडकरींचा कल असतो.
कृष्णा खोपडे यांची ही चौथी टर्म आहे. पूर्व नागपूरमधील त्यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. मात्र, त्यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील कामगिरी बघता यंदा त्यांना मंत्रीमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वाट्याला किमान राज्यमंत्रीपद येईल, असे भाजपच्या वर्तुळात बोलले जात आहे. परंतु, सध्याची स्पर्धा बघता खोपडेंना एखादवेळला महामंडळावरही समाधान मानावे लागू शकते,अशीही चर्चा आहे.