Maharashtra Politics : भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातील यादी जाहीर करतील. त्यानंतर उमेदवारांचे चेहरे समोर येतील. हे चेहरे पाहून जनता महायुतीला मतदान करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते नागपुरात बोलत होते. भाजपची दुसरी यादी, तिसरी यादी लवकरच येणार आहे. जसजशी चर्चा पुढे सरकते आहे, तसतसे उमेदवार ठरत आहेत. त्यामुळे पुढील याद्या लवकरच येतील, असे ते म्हणाले.
महायुतीत काही जागांचा प्रश्न आहे. त्यावर तत्काळ काहीतरी तोडगा निघेल. उमरेडची जागा परंपरागत भाजपची आहे. त्यामुळे त्यासाठी भाजप अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना विनंती करणार आहे. ‘परफॉर्मिंग’ आणि ’नॉन परफॉर्मिंग’ हा ‘पॅरामीटर’ नसतो. त्या त्या वेळेत निवडणुकीचं एक गणित असतं. कधी कुणाला थांबावं लागतं. कुणाला पुढे यावं लागतं. मागच्या वेळी मला थांबावं लागलं होतं आणि संघटनेचं काम करावं लागतं होतं, असं बावनकुळे म्हणाले.
जरांगेंबद्दल भाष्य
मनोज जरांगे पाटील यांनी सामाजिक आंदोलन केले. त्यांना जर वाटत असेल की, त्यांचे आमदार निवडून आले तर त्यांचा प्रश्न सुटू शकेल, तर तसं व्हावं. लोकशाहीत सर्वांनाच अधिकार आहे. कोणीही निवडणूक लढवू शकते, असं बावनकुळे म्हणाले. भाजपच्या 99 जागा जाहिर झाल्या आहेत. पक्षात कुठेही बंडखोरीची शक्यता नाही. एका ठिकाणी चार ते पाच इच्छुक असतात. ते असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तिकीट न मिळालेल्यांची नाराजी स्वाभाविक आहे. पण बंडखोरी हा भारतीय जनता पार्टीचा धर्म आणि कर्म दोन्हीही नाही, असं बावनकुळे यांनी सांगितलं. भाजपनचे यावेळी जे उमेदवार दिले, ही यादी प्रभावी आहे. या उमेदवारांची त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात प्रतिष्ठा आहे. महाविकास आघाडी विकासाच्या अजेंड्यावर तयार झालेली नाही. त्यांचा अजेंडा फक्त नरेंद्र मोदींचा विरोध करणे येवढाच आहे.
यंदा भाजपच्या पहिल्या यादीत कामठी मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने सलग तीन टर्म आमदार असलेल्या बावनकुळेंचे तिकीट कापले होते. या मतदारसंघातून टेकचंद सावरकरांना संधी मिळाली होती. पण आमदार टेकचंद सावरकर यांना महिनाभरापूर्वी लाडकी बहीण योजनेबद्दल वक्तव्य केलं. हे वक्तव्य त्यांना भोवलं आहे. लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड असल्याचे टेकचंद सावरकर म्हणाले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सावरकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या हाती आयते कोलीत सापडले होते. त्यामुळे सावरकर यांच्या जागी बावनकुळे यांना संधी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.