Lok Sabha Election : महाविकास आघाडीकडे आम्ही रावेरची जागा मागत होतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंसाठी ही जागा मागत होते. तेव्हाच मी त्यांना सांगितले, हा माणूस तुमच्याकडे राहणार नाही, हे गॅरंटीने सांगतो. शेवटी भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यावर सासरा विरोधात कसा उभा राहणार? राष्ट्रवादीने देखील निष्ठावंतांना उमेदवारी न देता पंधरा दिवसांत तीन पक्ष बदलणाऱ्याला उमेदवारी दिली. असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वंचितच्या उम्मेदवारासाठी भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत ॲड. आंबेडकर बोलत होते.
भ्रष्टाचारी लोकांना भारतीय जनता पक्षात आणल्यानंतर स्वच्छ करण्याचे ‘वॉशिंग मशिन’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. तसेच भाजप विचारसरणीचा माणूस पंधरा दिवसांत ‘सेक्युलर’ विचारांचा करून त्याला पक्षाची उमेदवारी दिली जाते. तर झटपट ‘ब्रेन वॉशिंग’ करणारे कोणते मशीन शरद पवार यांच्याकडे आहे? भाजपकडे भ्रष्टाचार धुवून काढण्याची वॉशिंग मशीन असल्याची टीका होते. मग महाविकास आघाडीकडे ब्रेन वॉश करण्याचे कोणते मशीन आहे असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीतील नेते जातीयवादी आहेत. मुस्लिमांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. उद्धव ठाकरे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील. दुसरीकडे मोदींनी केलेल्या आरोपांवर बोलण्याची काँग्रेस नेत्यांमध्ये धमक नाही. काँग्रेस गर्भगळीत झाली आहे, असे टीकास्त्र आंबेडकरांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमधून डागले.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, देशात चौकशी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देश 2026 पर्यंत आर्थिक संकटात सापडेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे जळगाव मतदारसंघातील उमेदवार युवराज जाधव, रावेर मतदारसंघातील उमेदवार संजय ब्राह्मणे, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा निरीक्षक शरद वसतकार आदी उपस्थित होते.