Shiv Sena : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील शिवसेनेने काँग्रेसपासून फारक घेतली. ठाकरे सेनेचा उमेदवार यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला आव्हान देत आहे. अशीच काहीशी परिस्थिती आता महायुतीमध्येही निर्माण झाली आहे महायुतीमधील शिंदेसेना भाजपपासून दूर राहात हरीश अलीमचंदानी यांच्या संपर्कात राहण्यास सुरुवात झाली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात आता हे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे अकोल्यात धनुष्यबाणाचे छुपे बळ शेगडीला मिळत आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजय अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विजय अग्रवाल हे आमदार झाल्यास अकोल्यातील भाजपसाठी ते डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अग्रवाल हे नाकापेक्षा मोती जड ठरू शकतात. त्यामुळे भाजपमधून त्यांना विरोध आहे. सर्वसामान्य मतदारही त्यांच्या विरोधात आहे. आतापर्यंत भाजपचे सर्वच माजी नगरसेवक प्रचारापासून दूर होते. मात्र आता काही जण दिखाव्यासाठी अग्रवाल यांचा प्रचार करताना दिसत आहे.
जागेसाठी प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अकोला पश्चिमच्या जागेसाठी आग्रही होता. या मतदारसंघातून विजय देशमुख यांना उमदेवारी मिळावी, अशी अनेकांची इच्छा होती. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जावा अशी भाजपमधील अनेक मोठ्या नेत्यांची इच्छा होती. परंतु विजय अग्रवाल सगळ्यांना पुरून उरले. त्यांनी उमेदवारी मिळविलीच. त्यामुळं ‘दुश्मन का दुश्मन एक दुसरे का दोस्त’ या म्हणीप्रमाणे आता सारे अग्रवाल विरोधक एकवटले आहेत. यात शिवसेना एकनाथ शिंदे गटही मागे नाही. शिंदे सेनेतील अनेक जण आता हरीश अलीमचंदानी यांच्या कंपूत शिरले आहेत.
शिवसेनेतील काही नेते उघडपणे तर काही पडद्याआड अलीमचंदानी यांच्यासोबत आले आहेत. भाजपमधील अनेक नेते, पदाधिकारी अद्यापही प्रचारापासून अलिप्त आहेत. लाजेखातर संघाचे काही स्वयंसेवक आणि भाजपचे काही पदाधिकारी आता प्रचारात दिसत आहेत. मात्र त्यापैकी किती लोक मनापासून प्रचारात सहभागी होत आहेत, हा विषय चर्चा आणि वादाचा ठरू शकतो. यासर्व परिस्थितीत शिवसेनेच्या धनुष्यबाणाची ताकद अलीमचंदानी यांना मिळत असल्यानं वंचित बहुजन आघाडीनंतर शिंदे सेनेची ताकद अलीमचंदानी यांच्यासोबत असल्याचं दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत. त्यामुळं कोण कोणासोबत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तसतसे राजकीय समीकरण बदलत आहेत. मतांच्या गणिताची जुळवाजुळव अद्यापही कायम आहे. काँग्रेसची गठ्ठा मत दिवसेंदिवस पक्की होत आहेत. भाजपच्या अडचणी मात्र कायम असल्याचं दिसत आहे. अशात निवडणुकीत कोण विजयी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.