Aashadhi Wari : आतापर्यंत केवळ हनुमंताच्या चरणी सेवा देणारे राणा दाम्पत्य विठुरायापुढे नतमस्तक झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमंताला शरण गेले. शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी हनुमान चालीसा पठण आंदोलन केले. प्रचंड विरोध असतानाही राणा यांचा भाजपने पक्षप्रवेश करून घेतला. नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारीही दिली. मात्र निवडणुकीत त्यांचा ‘संकट कटे मिटे सब पिडा’ हा मंत्र काही हनुमंताने ऐकला नाही. त्यामुळे नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.
निवडणुकीतील पराभवानंतर आता राणादाम्पत्य पंढरपूरच्या विठुरायाला शरण गेली आहे. आषाढी वारीची लगबग सध्या सुरू आहे. अशात माजी खासदार नवनीत राणा आणि विद्यमान आमदार रवी राणा या दाम्पत्याने वारीत सहभाग घेतला. पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस वारीतील महिलांसोबत पायी चालल्या. फुगडीचा फेर धरत त्यांनी आनंद लुटला. महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, श्रमजीवी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुख, समृद्धी तसेच शांतीसाठी श्री पांडुरंगाला साकडे घातले, असे राणा यावेळी म्हणाल्या.
वारकऱ्याचा पेहराव
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघांचे (Badnera Assembly Constituency) अपक्ष आमदार रवी राणा हे वारकऱ्यांच्या पेहराव्यात दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, शेतमजूर भगिनींसाठी मोलाचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील जनता महायुतीला आशीर्वाद देईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.वारीतील फोटो आणि व्हिडीओ देखील माजी खासदार नवनीत राणा यांनी ट्विट केले आहेत. त्यात त्या विठ्ठल चरणी नतमस्तक होताना दिसतात. डोक्यावर तुळस घेऊन पायी वारीत दिसतात. महिला वारकऱ्यांसोबत फुगडी खेळताना दिसतात. पती आमदार रवी राणा यांच्यासोबतही फुगडी खेळताना त्या दिसतात.
निवडणुकीत पराभव
अमरावती मधून भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला. मतदारसंघातून एकूण 37 उमेदवार रिंगणात होते. खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये होती. यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.
बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्याशी वाद असल्याने त्यांनी नवनीत राणांचा प्रचार केला नाही. “उद्धव ठाकरे यांचा पोपट बोलत होता की आम्ही शपथ घेऊ आणि मोदींना निमंत्रित करू. पण सर्वांनी पाहिले मोदींनी शपथ घेतली. शेर आखिर शेर ही होता है. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मी पराभूत झाली म्हणून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे”, अशी टीका नवनीत राणा यांनी पराभवानंतर केली होती.