Internal Dispute : आमदार आशिष जयस्वाल यांच्याशी असलेल्या वादातून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत अपशब्द काढणे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना भोवले आहे. मंगळवारी (15 ऑक्टोबर) प्रसार माध्यमांसमोर आपला संताप व्यक्त करताना रेड्डी काय बोलायचं आणि काही नाही याचं भान विसरले. त्यामुळं त्यांना आता सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आलं आहे. नागपुरात बोलताना रेड्डी यांनी आशिष जयस्वाल यांना उमेदवारी देण्यावरून विरोध व्यक्त केला. त्यावेळी बोलतानाइ रेड्डी यांनी फडणवीस, बावनकुळे झोपले आहेत का? असा प्रश्न केला.
प्रसार माध्यमांसमोर रेड्डी यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केले. सगळीकडे रेड्डी यांचे हे वक्तव्य आल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रेड्डी यांच्या कृतीची दखल घेतली. नागपूर ग्रामीणच्या कार्यकारिणीत मल्लिकार्जुन रेड्डी हे पदाधिकारी आहेत. ते यापूर्वी आमदारही होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पक्षाची शिस्त भंग केल्याबद्दल रेड्डी यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आले. आचारसंहिता लागली त्याच दिवशी ही कारवाई झाल्याने नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे आदेश काढले.
समर्थकांमध्ये धास्ती
मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरोधात कारवाई झाल्यानंतर आता त्यांचे समर्थकही धास्तावले आहेत. आमदार आशिष जयस्वाल यांनी निधी थांबविल्याचा आरोप आरोप रेड्डी व त्यांच्या समर्थकांनी केला. अधिकाऱ्यांवर दबाव आणत रेड्डी यांनी रामटेकमधील अनेक जिल्हा परिषद सदस्य, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिल्याचा आरोपही आहे. मात्र हे सगळे आरोप करताना रेड्डी यांनी फडणवीस, बावनकुळे, गडकरी यांच्याबाबत विधान करताना संयम न बाळगल्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता नागपूर जिल्ह्यात रेड्डी एकाकी पडण्याची चिन्हे आहेत.
रेड्डी यांनी आपला संताप व्यक्त करायला काहीच हरकत नव्हती. अन्याय होत आहे, असे वाटत असताना त्यांनी राजीनामा देणेही संयुक्तिक होते. परंतु नेत्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करीत, ते काय झोपले आहेत का, अशी भाषा करणं चुकीचं ठरल्याची प्रतिक्रिया आता भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. रेड्डी यांनी आरोप करताना काही ठराविक नेत्यांना खुश करण्यासाठी आशिष जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचा आरोप केला. मात्र संबंधित नेता कोण, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. निलंबनानंतर रेड्डी आता महाविकास आघाडीसोबत जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.