‘गेल्या विधानसभा निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघात ‘काही जवळच्या लोकांनीच अडचणी निर्माण केल्या’. यामुळे दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभव स्वीकारावा लागला. हमे तो अपनोने लुटा, गैरो में कहां दम था’, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी नुकताच केला आहे. तर पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पक्षाचा कोणताही आदेश पाळण्यास आपण सदैव तत्पर असल्याची पुश्तीही त्यांनी जोडली.
भाजपाचे जेष्ठ नेते आणि चारवेळा आमदार राहिलेले संचेती यांनी दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी संचेती यांनी, सुमारे पाच वर्षांनंतर मागील निकालावर भाष्य करताना गौप्यस्फोट केला. मलकापूर मतदारसंघातून यंदाही लढणार काय? अशी विचारले असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचवेळी सावध प्रतिक्रिया दिली. ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलो आहे. भाजपचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार आहे,’ असे ते म्हणाले. ‘मी लढण्यासाठी तयार आहे. किंबहुना पूर्ण तयारीने सज्ज आहे,’ असेही ते पुढे म्हणाले.
मनातील खदखद बोलून दाखविली
2019 च्या निवडणुकीतील पराभवाबद्दलही त्यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना ज्येष्ठ नेत्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला. आणि आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ‘मागील लढतीत ‘जवळच्या लोकांनी’ अनपेक्षितरित्या निर्णायक क्षणी अडचणी निर्माण केल्या. यामुळे दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यावेळी कळत नकळत झालेल्या चुकांपासून मी धडा घेतला आहे. किंबहुना जवळच्या लोकांनी निर्माण केलेल्या अडचणीपासून धडा घेतला आहे. आम्ही त्यावर चिंतन मनन केले आहे. कमी मतदान झालेल्या मतदानाचा अभ्यास केला आहे. आता अशा ‘अडचणी’ येणार नाहीत, अशी दक्षता घेणार असल्याचे संतेची यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजना नव्हे ब्रम्हास्त्र’
राज्याला चौफेर विकास आणि प्रगतीकडे नेणाऱ्या महायुती सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. ही योजना विधानसभा निवडणुकीत ब्रम्हास्त्र ठरणार असल्याचा दावा यावेळी संचेती यांनी केला. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठीत मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या समितीचा अध्यक्ष या नात्याने मी हा दावा करू शकतो. मलकापूर मतदारसंघात या योजनेला माता भगिनींचा मिळत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. यामुळे यंदाचा रक्षाबंधन सण खऱ्या अर्थाने लोकोत्सव ठरला. भगिनी आम्हाला ओवळीत आहेत. राख्या बांधून स्वागत करीत आहेत. भावांच्या विजयासाठी प्रार्थना करीत असल्याचे चित्र आहे, असे माजी आमदार संचेती यावेळी म्हणाले.
तो पराभव जिव्हारी
गेल्या लढतीत नवख्या उमेदवाराकडून झालेला दारुण पराभव संचेती यांच्या जिव्हारी लागला होता. नांदुरा नगर परिषदपुरते मर्यादित असलेले राजेश एकडे (काँग्रेस) यांनी संचेती (भाजप) यांचा तब्बल १४ हजार ८३४ मतांनी एकतर्फी पराभव केला होता. यामुळे ते राजकारणात माघारले अन त्यांची लाल दिव्याची संभाव्य संधीही हुकली. आता सुमारे पावणेपाच वर्षांनंतरही ही सल कायम असल्याचे यावेळी दिसून आले. या संवादातही त्यांनी ही खदखद बोलून दाखविली. मलकापूरमधून सन १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी पाच टर्म विजय मिळविला. १९९९ पासून पुढील २००४, २००९ आणि २०१४ च्या लढती भाजपतर्फे लढत त्यांनी सलग पाचदा विजय मिळविला.