Akola Incident : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यात दौऱ्यावर असताना काही नगरसेवकांनी एका माजी सैनिकाला त्याच्या घरात जाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी माजी सैनिक आयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल आहेत. यावरून आता राजकारण तापले आहे. ज्यांनी कारगिल युद्धामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगावर गोळी झेलली त्यांचा अपमान करण्यात आला, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. अमरावती येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली.
ज्यांनी भारत मातेचे रक्षण केले, अशा माजी सैनिकांचा मान भाजप करू शकत नाही. त्यांना धमकी देण्यात आली. त्यांना दवाखान्यात भरती करेपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला. अकोल्यात माजी सैनिकाला झालेल्या मारहाणीवरून पटोले यांनी आता भाजपवर हल्ला केला आहे. मारहाण करणारे उपमुख्यमंत्र्यांसोबत असल्याची टीकाही त्यांनी केली. जो देशासाठी लढला त्या सैनिकाला जर भाजपवाले मारत असतील तर यांच्यापेक्षा पापी कोण आहे. अकोल्यातील माजी सैनिक यासंदर्भात तक्रार घेऊन भेटीला आले होते, असे पटोले यांनी सांगितले.
तक्रार घेण्यास नकार
माजी सैनिक पोलिस ठाण्यामध्ये देखील तक्रार देण्यासाठी गेले होते. परंतु पोलिसांनी घेण्यास नकार दिला. मारहाणाीत माजी सैनिकाच्या डोक्याला दुखापत झाले आहे. पाइपने जोरदार प्रहार करण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. माजी सैनिकाची प्रकृती असल्याचेही पटोले म्हणाले. गृहमंत्री फडणवीस अकोल्यात होते. ज्या लोकांनी माजी सैनिकाला मारले तेच लोक त्यांच्यासोबत फिरत होते. महाराष्ट्रात हे काय चालले आहे? हे कॉंग्रेस खपवून घेणार नाही. काँग्रेसच्या काळात सैनिकांना अशी वागणूक कधीच मिळाली नाही, असेही पटोले यांनी नमूद केले.
माजी सैनिकाला झालेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी करावी. दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करणाऱ्या सैनिकांना भाजप अशी वागणूक देत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. सैनिक आपले घरदार, नातेवाईक, आई-वडील यांच्यापासून दूर राहात देशसेवा करतात. राष्ट्रासाठी ते आपले प्राण पणाला लावतात. देशसेवा करून सुखरूप परत आल्यावर त्याच सैनिकांना भाजप उद्धट वागणूक देते. अकोल्यातील बाजोरिया ले-आऊट परिसरातील आनंदनगरात राहणाऱ्या माजी सैनिक बुद्धपाल सदांशिव यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली. त्यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीनिमित्त काँग्रेसचे नवे चेहरे समोर येत आहेत. अर्ज भरण्यासाठी अनेक नवे आणि दमदार पक्ष कार्यकर्ते इच्छुक असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रात कॉंग्रेस एकमेव पक्ष आहे, ज्या पक्षाकडून जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे जनता आगामी निवडणुकीतल काँग्रेसला यश प्रदान करेल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.