Mahayuti 2.0 : महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबई येथे होत आहे. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी विधिमंडळातील आपला नेता निवडणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडण्यात येणाऱ्या नेत्याला शुभेच्छा दिल्या.
पक्षाच्या बैठकीमध्ये विधिमंडळातील नेता निवडला जाणार आहे. त्यापूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जो नेता निवडला जाईल त्यांना आपण शुभेच्छा देत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मुंबई विधान भवन परिसर ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे आणि मित्र पक्षांचे सगळेच आमदार विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत.
गुरुवारी शपथविधी
महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 डिसेंबर) मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला येणार आहेत. शपथविधीला काही तास शिल्लक असतानाच भारतीय जनता पार्टीची ही महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
अखेरच्या क्षणी भारतीय जनता पार्टी धक्का तंत्राचा वापर करू शकते, अशी चर्चा होती. मात्र भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी या संदर्भात नकार दिला आहे. भारतीय जनता पार्टीकडून कोणतेही सरप्राईज दिल जाणार नाही, असे भाजपच्या सर्वच नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी मुख्यमंत्रिपदी आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.
मोठे प्रयत्न
भारतीय जनता पार्टीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे राजकीय वर्तुळासह सामान्यांचेही लक्ष लागून आहे. भाजपचे जवळपास सर्वच आमदार सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी, अनेक नेते प्रयत्न करीत आहेत. मात्र मंत्री पदाची लॉटरी कोणाला लागते, याचा निर्णय पक्षाकडूनच घेतला जाणार आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेले आमदार नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच मुंबईतून परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरातील विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे नवनियुक्त उमेदवार सध्या गायब झाले आहेत. हे सर्व उमेदवार सध्या मुंबईमध्ये आणि ‘सागर’च्या किनाऱ्यावर बसून आहेत. एकदा मंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर यातील काही नेते आनंदोत्सव साजरा करत आपापल्या 1गावी परतणार आहेत.