Maharashtra New CM : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये कोणतीही कामं झाली नाही. भ्रष्टाचार आणि अनागोंदी हे सुरू होते. त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवली आहे. महायुतीला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले आहे. भाजपच्या बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार आहे. या बैठकीनंतर शपथ घेणारी मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचा कायापालट करतील, अशी माहिती नागपूरतील भाजपचे नवनिर्वाचित नेते आशिष देशमुख यांनी दिली.
भाजपच्या बैठकीसाठी नागपूरमधून आशिष देशमुख हे देखील मुंबईत पोहोचले आहेत. मुंबईमध्ये त्यांनी भाजपचे नेते तथा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून जो नेता निवडला जाईल, त्याच्या पाठीशी सगळेच आमदार उभे राहणार आहेत.
चित्र बदलणार
महाराष्ट्रमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारने कोणताही विकास केला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने तर महाराष्ट्राला अनेक वर्ष मागे लोटले. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे. महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यांना कोणी विचारेनासे झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये महायुतीकडून सक्षम सरकार महाराष्ट्राला मिळणार आहे. हे सरकार आगामी पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचा कायापालट करेल. कधी नव्हे इतका विकसित महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळणार आहे.
नवे मुख्यमंत्री हे विकासाचं व्हिजन असलेले राहणार आहेत. त्यामुळे विकासाच्या बाबतीत आता महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत व्हावं, असेही आशिष देशमुख म्हणाले. निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या सर्वच उमेदवारांची आता बैठक होत आहे. या बैठकीमध्ये विधिमंडळातील पक्षनेता निवडला जाईल. त्यानंतर लगेचच शपथविधी होणार आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये आशिष देशमुख यांच्या बोलण्याचा रोखही देवेंद्र फडणवीस यांचे नावच स्पष्ट करत आहे.
BJP Meeting : कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी बावनकुळे यांच्या शुभेच्छा
औपचारिक घोषणा शिल्लक
महायुतीला विजय मिळाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं. दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर फडणवीस यांचे नाव या पदासाठी निश्चित झाले आहे. मात्र या संदर्भातील घोषणा महायुती किंवा भाजपकडून करण्यात आली नव्हती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीचा मुहूर्त जाहीर केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. मुंबईच्या आझाद मैदानावर ज्या पद्धतीने भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे, त्यानुसार मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडणार, हे निश्चित आहे.