Nagpur : निवडणूक आली की राजकीय नेते एकमेकांवर सनसनाटी दावे करू लागतात. अशात एकनाथ खडसे यांनी 13 सप्टेंबर रोजी एक मोठा दावा केला आहे. नाथाभाऊ मी तुमची राज्यपालपदासाठी शिफारस करणार, असा देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. फडणवीस यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला ही ग्वाही दिली होती. एकनाथ खडसे यांच्या या दाव्यावर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे काय म्हणाले ते मी ऐकलेले नाही. परंतु एकनाथ खडसे यांच्या विषयी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. तसेच हा निर्णय आम्हाला मान्य देखील आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शनिवार 14 सप्टेंबर रोजी समाज माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे काय म्हणाले मला माहित नाही. त्यांच्या विधानाची त्यांना कल्पना नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. परंतु एकनाथ खडसे यांच्या बाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या पक्षातील सर्वांना तो निर्णय मान्य आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर समाज माध्यमांची संवाद साधताना सांगितले.
सोयाबीनच्या दरात वाढ
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी समस्यांच्या मुद्द्यावरून भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, कच्च्या खाद्य तेलावर कुठलेही आयात शूल्क नव्हते. परंतु आता कच्च्या तेलावर 20 टक्के आयात शूल्क आकारण्यात येणार आहे. तर शूद्ध तेलावर असलेला 12.5 टक्के वाढवून 32.5 टक्के इतका करण्यात आला आहे. यामुळे आता राज्यात पिकणाऱ्या सोयाबिनचे दर वाढणे हे सहाजिकच आहे. शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. सोयाबिन खरेदीचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. इतकेच नव्हे तर कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या देखील हिताचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
मागील काही काळापासून कांद्याच्या दराचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी किमान निर्यात किंमत पूर्णपणे काढून टाकली आहे. तसेच निर्यात शूल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणले आहे. यामुळे कांद्याचे दर स्थिर होण्याकरिता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वाची माहिती केंद्राने मान्य केली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे मनापासून अभिनंदन व्यक्त केले.
NCP Politics : गणेश मंडळात शरद पवार गटाच्या नेत्याची शिवीगाळ
काय म्हणाले होते खडसे
एकनाथ खडसे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा एके दिवशी मला भेटीसाठी बोलावणं आलं. मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो. त्यावेळी आम्ही दोघेच तेथे होतो. फडणवीस मला म्हणाले की, मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे. तशी मी पक्षाच्या वरिष्ठांकडे शिफारसही करणार आहे. त्यावर मी फडणवीसांना स्पष्टच म्हणालो की, देवेंद्रजी मला विश्वास बसत नाही. कारण तुम्ही बऱ्याचदा अशा प्रकारची आश्वासने देता, असं करेन, तसं करेन, पण तुम्ही कोणतीच आश्वासने पूर्ण करत नाहीत.
त्यावर फडणवीस मला म्हणाले की, आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. त्यावर मी त्यांना म्हणालो, मी राज्यपाल झालो तर चांगलेच आहे. माझ्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु तुमच्या या आश्वासनांवर माझा विश्वास बसत नाही. त्यावर फडणवीस मला म्हणाले की, मी माझ्या मुलीची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला राज्यपाल करण्याच्या तयारीत आहोत. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला सांगत आहे.