Assembly Election : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला हिंगणा विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. आता ती आघाडी कायम ठेवून बाजी जिंकण्याचे आव्हान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार रमेश बंग यांच्यापुढे आहे. पण रमेश बंग यांच्यापुढे भाजपचे समीर मेघे यांच्यापेक्षा काँग्रेसचे सुनील केदार यांचेच आव्हान मोठे आहे. केदार यांनी बंग यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी मोठे नाट्यही झाले. पण केदारांना यश आले नाही. त्यामुळे केदार यांचे हिंगण्यातील कार्यकर्ते बंग यांच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावण्याची दाट शक्यता आहे. तर समीर मेघे यांच्यापुढे लोकसभेत हिंगण्याने काँग्रेसला दिलेला कौल हे सर्वांत मोठे आव्हान आहे
हिंगणा कळमेश्वर
2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत हिंगणा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यापूर्वी हा भाग जुन्या कळमेश्वर मतदारसंघात होता. नीलडोह, डिगडोह, वानाडोंगरी सारख्या कामगारांच्या वस्त्या, वाडी, दत्तवाडी आणि पंचतारांकित एमआयडीसीचा दर्जा असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत यासह काही प्रमाणात ग्रामीण भागाचा या मतदारसंघात समावेश आहे. 2009 पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे.
2009 मध्ये भाजपचे विजय घोडमारे येथून विजयी झाले होते. पुढे त्यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते राष्ट्रवादीत गेले. 2014 व 2019 मध्ये समीर मेघे येथून विजयी झाले. हिंगणा मतदारसंघ ओबीसीबहुल असून, दलित मतांची संख्या निर्णायक आहे. बसपाचे डॉ. देवेंद्र कैकाडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिरुद्ध शेवाळे यांच्यासह एकूण 18 उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही मेघे विरुद्ध बंग यांच्यात आहे. दलित मतांच्या विभाजनावर या मतदारसंघाचे जय-पराजयाचे गणित अवलंबून आहे.
मेघे यांनी सलग दोनवेळा येथून विजय मिळविला आहे व यावेळी ते निवडून आले तर हॅटट्रिक होईल. तसे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहे. त्याचवेळी अनुभवी म्हणून मैदानात असलेले रमेश बंग त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यमान आमदार समीर मेघे यांनी विकास कामं केली. त्यांना यासाठी उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मदत झाली. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे झाली. गडकरी, फडणवीस या दोन्ही नेत्यांनी हिंगणा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. रमेश बंग या भागातून दोनवेळा निवडून आले आहेत. संपूर्ण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आहे. त्याचे चिरंजीव दिनेश बंग हे जिल्हा परिषद सदस्य आहेत.
काँग्रेसच्या अपेक्षा
सहकार क्षेत्रात कार्य असलेले बंग शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचेही येथे चांगले जाळे आहे. हा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यात विजयी झालेले काँग्रेस उमेदवार श्याम बर्वे यांना हिंगण्याने आघाडी दिली होती. त्यामुळे काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या. विधानसभेसाठी काँग्रेसने या जागेवार दावा सांगितला होता. मात्र जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडे गेली व रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर झाली.
हिंगणा आणि बुटीबोरी अशा दोन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. हा भाग या मतदारसंघात येतो. उद्योगांमुळे हिंदी, मराठी भाषिक येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाषिकदृष्ट्या हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. मतदारसंघाचा काही भाग ग्रामीण आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांची संख्याही मोठी आहे. अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये या भागात आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थी, शिक्षक आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मतदारसंघात दोन मोठ्या औद्योगिक वसाहती असूनही परिसराचा अपेक्षित विकास झालेला नाही.
रोजगाराचा प्रश्न
हिंगणा औद्योगिक वसाहतीत रोजगार निर्माण करेल असा एकही मोठा उद्योग नव्याने आला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवाय जे उद्योग या औद्योगिक वसाहतीत सुरू आहेत त्यात स्थानिक आणि बाहेरून येऊन स्थायिक झालेले मजूर असा वाद कायम आहे. पट्टे वाटपाचा प्रलंबित प्रश्न, ग्रामीण विकासाच्या आड येणारा झुडपी जंगलाचा प्रश्न, वेणा नदीकाठच्या गावांना पुरापासून संरक्षण देण्याची मागणी, इसासनी-बोखारा-गोधनी या निमशहरी भागात आजही किमान नागरी सोयींचा अभाव असे अनेक प्रश्न आहेत.
Nitin Gadkari : काँग्रेसने साठ वर्षांत साधे रस्तेही बांधले नाहीत
तरुण विरुद्ध अनुभवी
2019 च्या निवडणुकीत भाजपचे समीर मेघे 1,21,305 मते घेऊन येथे विजयी झाले होते, तर राष्ट्रवादीचे विजय घोडमारे 75138 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. वंचित बहुजन आघाडीचे नितेश जांगळे यांना 15371 मते मिळाली होती. भाजपचे उमेदवार समीर मेघे हे तरुण आहेत, तर रमेश बंग अनुभवी असले तरी आज 79 वर्षांचे आहेत. मतदारसंघाचा आमदार तरुण असला, तर तो लोकांसाठी धावून जाईल, त्यामुळे तिसऱ्यांदा मेघेच हवे, असे मानणारा मोठा वर्ग येथे आहे.