BJP : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नागपुरात पोह्यांना फोडणी दिली. अचानक वर्धा मार्गावर कांदेपोहे करत सामान्यांसोबत त्याची चव चाखली. काँग्रेसने हा इव्हेंट गाजवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपुरात झालेले हे पोहेपुराण सोशल माध्यमांवर ट्रेंडिंग होते. मात्र आपल्या मतदारसंघातील अखेरच्या प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर चांगलाच निशाणा साधला. राजकारणात जमिनीशी तळागाळात जुळून काम करावे लागते. केवळ नौटंकी करून मते मिळत नाहीत, या शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधी यांना सुनावले.
प्रचार पूर्ण नाही
देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या प्रचाराच व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना दक्षिण-पश्चिम नागपुरात प्रचारासाठी हवा तसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच ती धुरा अंगावर घेतली. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी फडणवीस यांची मोठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला मतदारसंघात अत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राहुलजी विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांनी मोदीजींकडून काही शिकले पाहिजे. जमिनीशी जुळून तासनतास काम करावे लागते. नौटंकी करुन मते मिळविता येत नाहीत, हे त्यांना समजायला हवे असे फडणवीस म्हणाले.
आम्ही केवळ विकासकामांवर प्रचार करत आहोत. मात्र महाविकास आघाडीकडे कुठलेच ठोस मुद्दे नाहीत. त्यामुळे समाजात तथ्यहीन बाबी पसरवून अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्यावर भर देण्यात येत आहेत. ते लव्ह जिहाद्यांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे अशा तत्वांना आम्हीदेखील बरोबर प्रत्युत्तर देऊ. राहुल गांधी मनाला येईल तसे आरोप करतात. समाजातील लोकांनी त्यांच्या बोलण्यात किती तथ्य असते याचा थोडा विचार करायला हवा, असे फडणीस म्हणाले.
महाविकास आघाडीत नेतेपदावरुन भांडणे आहेत. पण आमच्याकडे कुठलीही स्पर्धा नाही. त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने ते रेटून खोटे बोलत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.
पोह्यांची फोडणी लागली
राहुल गांधी यांनी पोह्यांना फोडणी दिल्यानंतर त्यावर भाजपचे कार्यकर्ते तर सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले होते. मात्र, दक्षिण-पश्चिमचे उमेदवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार फडणवीस यांनी आपल्या रॅलीमध्ये यावर भाष्य केलच. त्यानंतर काँग्रेसकडून ‘पोह्यांची फोडणी लागली’ या शब्दांत भाजपला ट्रोल केले जात आहे.