Political News 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधान आले आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांना वाढदिवसाला काहीही आणू नका, असे आवाहन केले आहे. असे असतानाच आता त्यांच्या निवासस्थानाबाहेर लागलेल्या बॅनरने सर्वांनाच अवाक् केले आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी एका कार्यकर्त्याने ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा बॅनला लावल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
राज ठाकरेंनी समाज माध्यमांवर पोस्ट करत वाढदिवसाला कोणतीही भेटवस्तू आणू नका, असे आवाहन केले होते. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी लक्ष वेधून घेतले होते. तरीही कार्यकर्त्यांकडून त्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली. मात्र एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्या बॅनरवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख राज ठाकरेंचा करण्यात आला आहे. चर्चेचा विषयच बनला आहे. माऊली धोके विभाग अधक्ष यांच्यातर्फे बॅनर लावण्यात आला असल्याचे समजते.
बिनशर्त पाठिंबा तरीही शपथविधीला निमंत्रण नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मुंबईच्या शिवाजी पार्कवरून गुढीपाडव्याच्या रॅलीला संबोधित करताना ठाकरे यांनी मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. “मला राज्यसभा किंवा विधानसभा नको, मी फडणवीसांना सांगितले. मी त्यांना म्हणालो, माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत आणि कोणत्याही अटी नाहीत. मोदी, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असे राज ठाकरे म्हणाले होते.
एवढे करूनही राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्यात निमंत्रण न दिले नसल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनीही शपथ घेतली. मोदींसह 58 मंत्र्यांनी शपथ घेतली. सरकारमध्ये मोदींसोबत 72 मंत्री असतील. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार मंत्री आहेत. यात 36 राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. अशात राज ठाकरे यांना निमंत्रण नसल्याने कार्यकर्ते आणि चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शपथविधी सोहळा पूर्ण झाल्यावर राज ठाकरे यांची कुठलीही प्रतिक्रिया न आल्याने चर्चेला आणखी उधाण आले.