Accident : चोरखमारा गेटजवळ झालेल्या दुचाकी अपघाताने परिसरात खळबळ उडाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अशा परिस्थितीत, भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी माणुसकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. दैनंदिन दौऱ्यावर असताना, त्यांनी जखमींना तातडीने मदत केली. आपल्या गाडीतून तिरोडा येथील शासकीय रुग्णालयात त्यांना नेले आणि उपचारासाठी स्वतः पुढाकार घेतला.
अपघाताच्या ठिकाणी झालेली स्थिती अत्यंत चिंताजनक होती. दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या सोबत असलेला परिवारही घाबरलेला होता. अपघातग्रस्तांना मदतीसाठी कुणीही पुढे येण्यास धजावत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत, खासदार पडोळे यांनी आपला ताफा थांबवला आणि तातडीने मदत केली. त्यांनी जखमींना धीर देत, “घाबरून जाऊ नका, मी तुमच्यासोबत आहे,” असे म्हणत परिवाराचे मनोबल वाढवले.
रुग्णालयात पोहोचविले.
तिरोडा शासकीय रुग्णालयात पोहोचताच, त्यांनी त्वरित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आणि जखमींवर ताबडतोब उपचार सुरू केले. डॉ. प्रशांत पडोळे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःदेखील उपचार प्रक्रियेत मदत केली. या घटनेनंतर डॉ. पडोळे यांचे कौतुक केले जात आहे. एक खरा लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. प्रशांत पडोळे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
तिरोडा येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनीही डॉ. पडोळे यांच्या तातडीच्या मदतीचे कौतुक केले. त्यांच्या वेळीच दिलेल्या मदतीमुळे जखमींना गंभीर परिणाम भोगावे लागले नाहीत. ही घटना स्थानिक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. डॉ. प्रशांत पडोळे यांनी दाखवलेली माणुसकी लोकांच्या मनात कायमचे घर करून गेली. राजकारणापलीकडे जात माणुसकी आणि कर्तव्याची जाणीव ठेवणाऱ्या खासदारांची ओळख या घटनेने अधिक मजबूत झाली आहे.
विजयी
लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रशांत पडोळे यांना सुरवातीला डमी उमेदवार म्हणून हिणवले जात होते. पण प्रचारादरम्यान त्यांनी अशी काही आघाडी घेतली की, नंतर नंतर ते ‘विनिंग कॅंडिडेट’ झाले. पाहता पाहता त्यांनी विजयाची रेषा ओलांडली. भाजपचे बलाढ्य नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले सुनील मेंढे यांचा त्यांनी पराभव केला. त्यांना उमेदवारी देणारे नाना पटोले यांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. खासदार झाल्यावरही एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे. नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या घटनेने त्याचा प्रत्यय जिल्हावासीयांना आला.