Packaged Drinking Water : भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) बाटलीबंद पाणी सर्वांत अतिधोकादायक ठरविले आहे. त्यामुळं आता सर्व मिनरल वॉटर उत्पादकांना पाण्याचं व ते पाणी विकणाऱ्या कंपन्यांच्या ऑडिटला सामोरे जावे लागणार आहे. अलीकडेच केंद्र सरकारने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून (BSI) दिलं जाणारं प्रमाणपत्र मिळवण्याची अनिवार्य अट रद्द केली आहे. आता एफएसएसएआयने हा नवीन निर्णय घेतला आहे. सरकारी विभागाचा हा निर्णय मिनरल वॉटर विक्रेत्या कंपन्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नव्या नियमांनुसार आता सर्व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर उत्पादकांना एफएसएसएआयच्या वार्षिक तपासणी ऑडिटला सामोरं जावं लागेल. कोणत्याही कंपनीला परवाना मिळवण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी करून घ्यावी लागेल. त्याशिवाय कोणालाही यापुढं बाटलीबंद पाणी विकता येणार नाही. बाटलीबंद पाण्याला आता अतिधोकादायक पदार्थांच्या यादीत टाकण्यात आलं आहे. पाणी दूषित असल्यास लोकांना सर्वांधिक आजाराला समोरे जावे लागते. दूषित पाण्यातून अनेक आजार आणि साथ पसरू शकते. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपन्यांना बंधन
बाटलीबंद पाणी पिणाऱ्या लोकांना खरोखर शुद्धता मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांना खरोखर मिनरल वॉटर मिळावं, यासाठी आता हे बंधन घालण्यात आल्याचं भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने स्पष्टं केलं आहे. त्यामुळं सरकारने आता बाटलीबंद पाणी उत्पादनाचे नियम आणखी कडक केले आहेत. प्रवासादरम्यान लोकं मोठ्या प्रमाणावर बाटलीबंद पाणी खरेदी करतात. दहा रुपयाला मिळणारे हे पाणी खरोखर शुद्ध आहे काय, याबद्दल आतापर्यंत तपासणी होत नव्हती.
काही कंपन्या दावा करतात की त्यांनी यात मिनरल्स आहेत. या पाण्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, असं मानलं जातं. मात्र ही वास्तविकता नसल्याचं आता सांगण्यात येत आहे. त्यामुळं बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियम कडक करण्यात आले आहे. सरकारी विभागांकडून करण्यात येणारे नियम आणखी कडकपणे पाळण्यात येणार असल्याचंही भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने नमूद केलं आहे. त्यामुळं यापुढं पाण्यात भेसळ करणाऱ्या किंवा बनावट मिनरल वॉटर विकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई देखील होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचं सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे. यातून सामान्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असं अपेक्षित आहे.