Politics : सहावेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे सध्या कन्फ्युज मोडवर आहेत. काय करावं, कोणत्या पक्षात जावं, त्यांना सुचेनासे झाले आहे. कधी आपण अजित पवारांसोबतच आहोत असा खुलासा करणारे आमदार शिंगणे हे सतत सरकारवर टीका करीत आहेत. याशिवाय आपल्या मतदारांना आपण स्वतः कन्फ्युज असल्याचे सांगून मला समजून घ्या अशी विनवणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ‘आमदार कन्फ्युज’ म्हणूनही सध्या त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
शुक्रवारी चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. यावेळी आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे भाषण चांगलेच गाजले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी सूचक भाष्य केले. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे कौतुक केले. मात्र ‘सोयाबीनला भाव नाही अन् योजनांची खैरात चालवली. मला माहित नाही पुढे या योजनांची अंमलबजावणी कशी होईल. कारण मी महिना दीड महिन्यापासून मुंबईच्या टच मध्ये नाही’ असे वक्तव्य करत सरकारवर टीकाही केली.
‘मी सध्या काठावर आहे, काठावर म्हणजे तुम्ही समजून घ्या. काठावरचा माणूस मागेही जाऊ शकतो किंवा पुढेही जाऊ शकतो’, असे सूचक वक्तव्य करीत भविष्यातील राजकीय वाटचालीचा हेतूही स्पष्ट केला.
दुर्लक्ष होणार नाही
डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, लोकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्यामुळेच मी मंत्री झालो पालकमंत्री झालो. कोरोना काळात माणसं जगवणे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यावेळी सर्व काही बंद असल्याने निधी उपलब्ध होऊ शकला नाही. जो निधी उपलब्ध होत होता तो आरोग्यावर खर्च करण्यात आला. अडीच वर्षानंतर आमचं सरकार गेलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घरी गेले. मी देखील मंत्री म्हणून घरी गेलो. वर्ष सव्वा वर्ष विरोधी पक्षात राहून काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र निधी मिळत नव्हता. शेवटी ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिल त्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून अजितदादांच्या सोबत महायुतीत आलो. त्यामुळे अलीकडच्या काही काळात मोठ्या प्रमाणात कामे करता आली, असे ते म्हणाले.
सरकार जोमाने कामाला लागले आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ८० निर्णय झाले. मी देखील मंत्री म्हणून काम केलं. मात्र एका बैठकीत एवढे निर्णय कधी पाहिले नाहीत. अनेक महामंडळाची घोषणा केली. मात्र मागच्याच महामंडळाची अजून बोंब आहे. त्यांनाच निधी नाही, असे म्हणत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीला चिमटा घेतला. सरकार एकीकडे योजनांची खैरात चालवत आहे, मात्र सोयाबीनला भाव नाही. माझे सोयाबीन दोन वर्षापासून पडून होते, आता यावर्षी ते विकायला लावले असेही ते म्हणाले.
आम्ही काठावर..टाळ्यांचा एकच गजर
जिल्हा परिषद पंचायत समिती वाल्यांना अजून वेळ आहे.vसध्या आम्ही काठावर आहे, काठावर म्हणजे तुम्ही समजून घ्या.. काठावरचा माणूस मागेही जाऊ शकतो, पुढेही जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य डॉ.शिंगणे यांनी केले यावेळी टाळ्यांचा एकच गजर झाला.