Yavatmal Washim Constituency : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या चुरस सुरू आहे. सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भावना गवळी सध्या बॅकफुटवर आहेत. त्यांना शिवसेनेच्यावतीने तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे भावना गवळी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच नाराजीचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.
शिंदे गटातील सुंदोपसुंदी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. उलटपक्षी पक्षांतर्गत कलह हा दिवसागणिक वाढत आहेत. हा कलह आता चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक बोलावली आहे. आढावा बैठकीला भावना गवळी गैरहजर राहणार नसल्याची माहिती आहे. त्या जर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैरहजर राहिल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नेत्यांनी घेतली भेट
भावना गवळी यांना यावेळी शिवसेनेच्यावतीने तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे भावना गवळी नाराज आहेत. यातच भावना गवळी यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी मुख्यमंत्री यांचा निरोप घेऊन मंत्री उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी भावना गवळी यांची भेट घेतली. रिसोड येथील निवासस्थानी त्यांनी गवळींची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. असे असताना देखील भावना गवळी यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील राजकारण कलाटणी घेते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भावना गवळी या माझ्या बहिणीसारख्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. उमेदवारी नाकारली तरी त्यांचे पुनर्वसन करू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आश्वासनानंतर देखील भावना गवळी यांची नाराजी कायम आहे. त्यांची आढावा बैठकीत अनुपस्थिती अनेक गोष्टी स्पष्ट करते. गवळी यांनी एकनाथ शिंदेंविरुद्ध उघड बंड केले आहे असे यातून मानले जाईल.
Lok Sabha Election : भावना गवळींची उमेदवारी रद्द करून महायुती जिंकेल का ?
महाविकास आघाडीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांचे शिलेदार संजय देशमुख यांनी प्रचारात सुरवातीपासूनच आघाडी घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना सध्या एकत्र आहेत. त्यांनी आधीपासूनच नियोजन केले. त्यानुसार सामूहिक प्रचाराचा धडाका लावला. परिणामी विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच भावना गवळी यांचे बंड कायम आहे. हे बंड डोकेदुखी ठरत आहे. भावना गवळी काही वेगळा निर्णय घेतात का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.