BJP win Haryana : हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा सलग विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्रिक साधली. सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने केलेल्या विकासाच्या योजनांमुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवत भाजपला विजय मिळवून दिला होता, आता हरियाणा विधानसभा निवडणुकीतही त्याच विश्वासावर अधोरेखित झाले आहे. या विजयाचा उत्सव खामगाव मतदारसंघात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. आमदार आ.ॲड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि आतषबाजीत जल्लोष केला. या जल्लोषात स्थानिक नागरिकांचा देखील मोठा सहभाग होता.
मोठा विजय
विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी नागरिकांना जिलेबी वाटली. आ. ॲड आकाश फुंडकर यांनी स्वतः उपस्थित नागरिकांना जिलेबी भरवून त्यांचे अभिनंदन केले. विजयाच्या या सोहळ्यात मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयानंतर बोलताना आ. ॲड. फुंडकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपच्या विकासाच्या धोरणांमुळे जनतेचा विश्वास कायम राहिला आहे. हरियाणात मिळालेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील भाजपच्या महायुतीला असाच मोठा विजय मिळेल, याची मला खात्री आहे.”
खामगावच्या गांधी चौकात रात्री नऊ वाजता आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली. तसेच आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना जिलेबी भरवून आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी ढोल ताशाच्या गजरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नाचत जल्लोष केला. यावेळी भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक सागरदादा फुंडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, जिल्हा सचिव तथा खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, प्रसिद्ध उद्योजक संतोष डिडवाणी, राजेश झापर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष विलास काळे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तसेच खामगाव जिल्हा प्रभारी राम मिश्रा, माजी उपनगराध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता बळी पडली नाही
फुंडकर म्हणाले, ‘काँग्रेसच्या विखारी प्रचाराला हरियाणाची जनता बळी पडली नाही. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दर्शविला. हरियाणातील जवान ,पैलवान आणि किसान यांनी पुन्हा एकदा भाजपाला पसंती देत विकास व सुरक्षेच्या मुद्द्यावर तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे आभार व्यक्त करीत हरियाणा प्रमाणेच येत्या निवडणुकीत महाराष्ट्र व झारखंडमध्ये विजयाचे हे चित्र दिसणार असून भाजपा ला जनता पुन्हा आशीर्वाद देईल.’