Bhandara : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भंडारा जिल्ह्याला डावलण्यात आले. परिणामी राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर उमटला आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा आणि तुमसर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. जिल्ह्याला किमान एका मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र जिल्ह्याची पाटी कोरीच राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, तर नेत्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) आमदार असलेले नरेंद्र भोंडेकर मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. भोंडेकरांच्या कामगिरीमुळे आणि लोकप्रियतेमुळे त्यांची निवड होईल, अशी अपेक्षा स्थानिक नेत्यांना होती. पवनी येथील प्रचारसभेत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचा शब्द दिल्याचे भोंडेकर सांगतात. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी शिवसेना उपनेतेपद आणि विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला आहे.
2009 साली शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार म्हणून निवडून आलेले भोंडेकर 2019 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. 2024 मध्ये शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांचे स्थानिक विकासकामांमध्ये मोठे योगदान आहे. मात्र, त्यांना डावलण्यात आल्यामुळे नाराजीचा भडका उडाला आहे.
राष्ट्रवादीतही नाराजी..
तुमसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार राजू कारेमोरे हेही मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार होते. पक्षाच्या कामावर त्यांची मजबूत पकड, स्थानिक पातळीवरची लोकप्रियता, आणि प्रफुल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा. यांमुळे त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनाही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी गोटात नाराजीचा सूर आहे.
कारेमोरे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी विविध विधायक कामांद्वारे मतदारसंघात स्वतःची प्रतिमा उभी केली आहे. स्थानिक पातळीवरील त्यांच्या कामांमुळे मतदारांना मोठ्या अपेक्षा होत्या. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजी पसरली आहे.
डावललेल्या भंडाऱ्याचा उद्रेक..
भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन महायुतीच्या पदरात पडले. तरीही जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. “जिल्ह्यातील किमान एका तरी आमदाराला संधी मिळायला हवी होती,” असे मत नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
राजकीय चर्चांना उधाण..
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांना डावलल्याने राजकीय वर्तुळात खदखद सुरू झाली आहे. पुढील काळात नाराज नेत्यांची भूमिका आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कशा प्रकारे बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.