Transfer Order : भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या बदलीनंतर जिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी भावनिक झाले आहेत. नागपूर शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून कार्यरत असताना मतानी यांनी चौकटीच्या बाहेर जात अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. कोविड महासाथ असताना नागपुरातील एका वयोवृद्ध महिलेला मतानी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रातोरात घर बांधून दिले. कोविडची महासाथ आणि तुफान पाऊस, असे तेव्हाचे वातावरण होते. मतानी यांच्या या कार्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. नागपूर शहरात डीसीपी म्हणून कार्यरत असताना कोणताही वाद त्यांच्याभोवती कधीच निर्माण झाला नाही.
उपराजधानीतील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मतानी यांची बदली भंडारा जिल्ह्यात करण्यात आली. भंडारा येथेही मतानी यांच्या नावाभोवती वादाचे वलय कधीच निर्माण झाले नाही. यूपीएससीच्या परीक्षेत देशभरातून 188वा क्रमांक प्राप्त करणारे 34 वर्षीय लोहित मतानी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य केले. जिल्ह्यातील अनेक पोलिस कुटुंबांचे पितृत्व त्यांनी स्वीकारले. पोलिसांच्या कुटुंबातील तरुणाईला त्यांनी स्वतः स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. पोलिसांच्या परिवारासाठी भंडाऱ्यात कौशल्य योजना ही त्यांनीच सुरू केली.
युथ फोरम
पोलिसांच्या कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मतानी यांनी विविध उपक्रम राबवले. त्यातून कापडाच्या पिशव्या, फिनाईल, सॅनिटायझर, अगरबत्ती यांचे उत्पादन सुरू झाले. अनेक महिलांना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाले. मतानी यांच्या कामामुळे प्रभावित झालेल्या तरुणांनी युथ फोरम स्थापन केला. शहापूर येथे कर्मशीला प्रकल्पाची सुरुवात झाली. या ठिकाणी तरुणाईला अत्यंत कमी शुल्कात यूपीएससी आणि एमपीएससीचे मार्गदर्शन मिळू लागले.
भंडारा पोलीस दलात प्रथमच गणेशोत्सव साजरा व्हायला लागला. मतानी हे स्वतः सायबर क्राइम विषयात पीएच.डी. आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवताना त्यांच्या अनुभवाची पोलिसांना मदत झाली. दोन वर्ष आपला कार्यकाळ गाजवणारे मतानी आता राज्याची राजधानी मुंबईत जाणार आहेत. आपल्या कामातून त्यांनी कोणाला खुश केले आणि कोणाला नाराज हा विषय वादाचा ठरू शकतो. पण लोहित मतानी या नावाने भंडारा जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराची मने नक्कीच जिंकली आहेत.
कोणत्याही परिस्थितीत कणखर राहण्याचे प्रशिक्षण लढवय्या वृत्ती असलेल्या व्यक्तीला प्रशिक्षण काळात दिले जाते. हे कठोर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर असा व्यक्ती अंगावर ‘वर्दी’ धारण करतो. ही वर्दी एकतर सैनिकाची असते किंवा पोलीस अधिकाऱ्याची. वर्दी कोणतीही असो, डोक्यावर आणि खांद्यावर राजमुद्रा लावण्याचा अधिकार केव्हा वर्दीवाल्यांनाच मिळतो. त्यामुळे लोहित मतानी हे वर्दीची शान कायम राखण्यात यशस्वी झाले काय? याचे उत्तर केव्हा भंडाऱ्यातील पोलिस आणि त्यांचे कुटुंबीयच देऊ शकतात. एक बदली आदेश आला म्हणून अगदीच खचून जाणाऱ्यांपैकी लोहित मतानी नाहीत.
आज ते एसपी आहेत. उद्या आयजी, एडीजी आणि प्रसंगी डीजीदेखील होतील. लोहित मतानी यांनी काय केले आणि ते कसे आहेत, हे विचारायचे झाल्यास नागपुरातील त्या म्हाताऱ्या आजीला विचारावे लागेल. भंडारा जिल्ह्यातील पोलिस आणि त्यांच्या परिवाराला विचारावे लागेल, अशी चर्चा आहे. अधिकारी म्हटले की बदली होणारच. तो अटळ नियम आहे. पण ही बदली होत असतात मतानी यांना नक्की वाटत असेल की, ‘मैने जब गिरेबान में खुद को झाक कर देखा, तो अपने आपको उचाही पाया..’, असे भंडारा पोलिस दलात बोलले जात आहे.