Narendra Bhondekar : मंत्रिपदाचा दिलेला शब्द न पाळल्याने भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजप प्रवेशासाठी देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मात्र, मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाचा पश्चाताप होतोय,” असे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
शिवसेनेच्या उपनेता पदाचा राजीनामा दिल्याचे सांगत त्यांनी नाराजी स्पष्ट केली. ते म्हणाले, “दोन-अडीच वर्षांपूर्वी मी अपक्ष आमदारांमधून सर्वात आधी शिंदेंसोबत गेलो. कोणताही स्वार्थ ठेवला नाही. मला मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मंत्रिपद मिळाले नाही. तरीही मी सरकारसोबत राहिलो. पक्षप्रवेशानंतरही मंत्रिपद दिले नाही. आता जे नंतर पक्षात आले त्यांना मंत्री केले. त्यांच्यावर विचार होतो, आमच्यावर नाही. ही बाब खूप दु:खदायक आहे, असेही भोंडेकर म्हणाले.
प्रामाणिकतेला किंमत नाही..
आम्हाला पक्षाचे मोठे पद दिले, पण त्याचा उपयोग काय? कुठल्याही निर्णयात विचार होत नाही. प्रामाणिकतेला किंमत नाही. उलट जे पक्षप्रवेश करतात, गोंधळ घालतात, त्यांनाच मान मिळतो. हे पाहून खंत वाटते, असे ते म्हणाले.
भंडारा जिल्ह्याला आजतागायत आपला पालकमंत्री मिळालेला नाही. बाहेरून मंत्री दिले जातात. त्यामुळे विकासाचा वेग थांबतो. पक्षप्रवेश कार्यक्रम याच अपेक्षेने केला होता. मात्र, काहीच घडले नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
का दिला राजीनामा?
नेता, उपनेता, समन्वयक ही पदे मोठी आहेत. पण जर मला लोकांसाठी न्याय देता आला नाही तर या पदाचा उपयोग नाही. म्हणून राजीनामा दिला, असे भोंडेकर म्हणाले. मी सध्या शिवसेनेत आहे. मात्र, भविष्यातील काही गोष्टी बोलण्याची योग्य वेळ अजून आलेली नाही,” असे सांगत त्यांनी राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
फडणवीस नेते म्हणून मला आवडतात. त्यांनी पक्षप्रवेशाचा आग्रह धरला होता. मात्र, पक्षांतराचा आरोप लागू नये म्हणून मी शिवसेनेत गेलो. हा निर्णय चुकल्याचे आता वाटते,” असेही भोंडेकर म्हणाले. भोंडेकरांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.