महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित होते. अर्जुनी मोरगाव, तिरोडा, तुमसर या तिन्ही जागांवर राष्ट्रवादीचा दावा असल्याचे त्यांनी मेळाव्यात सांगितले. ‘आम्ही या जागा लढविणार आहोत’, असे देशमुखांनी म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे म्हटले. त्यावर धर्मराव आत्राम यांनी अहेरीतून निवडणूक लढण्याचे आव्हान देशमुखांना दिले. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुखांनी खळबळजनक दावा केला. आत्राम यांची कन्या भाग्यश्रीच आपल्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचा दावा त्यांनी केला. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगीच त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. आतापर्यंत धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने शरद पवारांना तीन वेळा भेट घेतली आहे. वडिलांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही असे भाग्यश्रीने पवारांना सांगितले आहे,’ असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला. धर्मराव आत्राम जे कडक जॅकेट घालतात, ते सुद्धा काही दिवसातच उतरणार आहे, असा खोचक टोलाही यावेळी अनिल देशमुख यांनी लगावला.
आगामी निवडणुकीत आपले उमदेवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांना दिली. यावेळी माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, प्रदेश महामंत्री दिलीप पनकुले, प्रदेश उपाध्यक्ष व प्रभारी बजरंगसिह परिहार, रविकांत बोपचे, गोंदिया जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, मिथून मेश्राम व कार्यकर्ते उपस्थित होते..
काय म्हणाले होते आत्राम?
अनिल देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक माझ्या विरोधात अहेरीतून लढून दाखवावी. मला जर अजित पवार यांनी आदेश दिले, तर ज्या मतदार संघातून अनिल देशमुख लढतील तिथे त्यांच्या विरोधात लढण्यास मी तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी लढू नये. लढल्यास त्यांची जमानत जप्त होणार, अशी टीकाही धर्मरावबाबा आत्राम यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना केली होती.
विधानसभा निवडणुकीत कोणता उमेदवार कुठून लढणार हे त्या त्या पक्षातील नेते ठरवतात. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढणे टाळावे. त्यांनी अहेरीतून माझ्या विरोधात लढावे. मी घाबरत नाही. माझा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कोणताही उमेदवार दिला तरी मी लढणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढले तर अनिल देशमुख यांना त्यांचाच पक्षाची मते मिळणार नाहीत, अशी टीका आत्राम यांनी केली. शरद पवार गटाचे नेते जयंतराव पाटील माझा संपर्कात आहेत. महायुतीत सामील होण्यासाठी ते इच्छुक आहेत, असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले होते.
विरोधक बॅकफुटवर
महायुती लोकांची मतं जाणून घेत आहे. महायुतीत प्रत्येक पक्ष सर्व्हेच्या आधाराने उमेदवारांची चाचपणी करीत आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद बघता विरोधी पक्षातील लोक आता बॅकफूटवर गेले आहेत, अशी टीकाही धर्मरावबाबा आत्राम यांनी केली होती.