War In Relation : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शरद पवार हे एकामागून एक धक्का देताना दिसत आहेत. अशात राज्यातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला हात लावाल, तर कापून टाकेन, असा गंभीर इशारा धर्मराव बाबांना दिला आहे.
शरद पवारांचा साथ
धर्मरावबाब आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग धरला आहे. भाग्यश्री आत्राम शिवस्वराज यात्रेत सहभागी झाल्यात होत्या. अहेरी (Aheri) विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या तोंडावर आत्राम घरात या पक्ष प्रवेशामुळे फूट पडली आहे. त्यामुळे अहेरी विधानसभेत ‘बाप विरुद्ध लेक’ असा सामना रंगणार आहे. शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी थेट आपल्या वडिलांनाच धमकी दिली आहे.
आत्राम विरुद्ध आत्राम
भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार हे समोर आल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली होती. आत्राम म्हणाले होते की, माझी मुलगी अन् जावयाला नदीत फेकून द्या. यावर प्रत्युत्तर देत भाग्यश्री म्हणाल्या की, ‘धर्मराव बाबा आत्राम माझे वडील आहेत. मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली. ते चुकीचे होते. मंचावर अजित पवार होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. तरीही ते बोलले. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. अहेरी विधानसभा मदतारसंघात अनेक प्रश्न आहेत. रस्त्यांची समस्या असताना कार्यकर्त्यांची गर्दी होणे, हे आपल्यावरील प्रेम दिसतं. आदिवासी नागरिक, महिलांचे प्रश्न दुर्लक्षित करण्यात आलेत.
नाव न घेता टीकाच
वडिल धर्मराव बाबा यांना लक्ष्य करीत भाग्यश्री म्हणाल्या, आपले मंत्री साहेब येतात आणि जातात. समस्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या वडिलांविरोधात निवडणूक लढू शकतात, असे संकेत आहेत. भाग्यश्री आत्राम पुढे म्हणाल्या की, ‘मी घर फोडून जात नाही. धर्मरावबाबा हे नक्षल्यांच्या तावडीत होते. तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. बाबांवरील फिल्ममध्ये त्यांनी कबूल केले आहे. अजितदादा यांनी म्हटले, चूक झाली. तुम्हीही शरद पवार गटात या. चूक सुधारा. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.