Bhandara Gondia constituency : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. आणि आता 46 दिवसांनी निकाल लागणार आहे. मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. मतदानानंतर कोण विजयी होणार ? या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. महायुतीचे सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजयावर पैज लागत आहे.
गल्ली बोळासह, पानटपऱ्या व चौका-चौकात 4 जून रोजी कोणाचा गुलाल उधळणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. रिंगणात 19 उमेदवार असले तरी प्रमुख दोन उमेदवारांच्या विजय व पराभवाची पैज लावली जात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेवार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आघाडी व महायुतीमधील उमेदवारीवरुन सुरू असलेल्या चढाओढीला अखेर पूर्ण विराम मिळाला. महाविकास आघाडीने डॉ. प्रशांत पडोळे तर महायुतीने जुना चेहरा खा. सुनील मेंढे यांना रिंगणात उतरविले.
महायुतीचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात वर्चस्व लक्षात घेत सुनील मेंढे यांचे पारडे जड राहील असा अंदाज सुरुवाती पासून वर्तवला जात होता. मात्र, जस-जशी निवडणूक रंगात आली तस तसा महायुतीचा उमेदवार मागे पडताना दिसला.
19 उमेदवारां पैकी असले तरी काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे व भाजपचे सुनील मेंढे या दोघांचीच चर्चा आहे. उर्वरित 17 उमेदवारांचा सट्टाबाजारात नाव पत्ता दिसून येत नाही. मतदानानंतर सुनील मेंढे पेक्षा प्रशांत पडोळे यांना अधिक भाव मिळत असल्याने मेंढे यांची बाजू सरस असल्याचे जाणवत होते. मात्र,आता सट्टा बाजारातही दोन्ही उमेदवारांचा भाव समतोल होऊ लागला. सुनील मेंढे यांना 40 पैसे तर डॉ. पडोळे यांना 45 ते 50 पैसे असा भाव मिळत असल्याचे सुत्राकडून कळले. यामुळे सट्टाबाजारातही निकालाचा संभ्रम वाढवला आहे.